Weather | गारपीट: १२६६ हेक्टरवरील पिके भुईसपाट; ३७८५ शेतकर्‍यांचे नुकसान

0

वादळी वारा, गारपिटीने झोडपले 



वैजापूर तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे मोठी दाणादाण उडाली असून तालुक्यात एकूण १२ ६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गारपिटीने तालुक्यातील ३ हजार ७८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 








 वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे मोठी दाणादाण उडाली. विशेषतः वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्दसह परिसरात  गारपिटीसह झालेल्या पावसामुळे जवळपास ३ हजार ७८५ शेतकऱ्यांच्या १२६६ हेक्टर क्षेत्रावरील पिके उध्वस्त झाली आहेत. यामध्ये बहुतांश कांद्यासह हरभरा, गहू व फळपिकांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय एका प्राथमिक अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. याशिवाय तालुक्यातील नायगव्हाण, टुणकी, कविटखेडा, बाभुळतेल, वळण, अंचलगाव आदी भागातही जोरदार वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले. अनेक झाडे कोलमडली तर शेतातील गव्हासह कांद्याला फटका बसला आहे. तसेच बहुतांश भागात पत्र्यांच्या शेडसह झोपड्या उडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 



दरम्यान गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू आहेत. हवामान खात्याने ५ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता नसली तरी मागील काही दिवसांपासुन ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा शिडकावा, वा-यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे.‌ त्याचा परिणा होत असल्याने रब्बी  पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकरी म्हणत आहे. मंगळवारी व बुधवारी दुपारच्या सुमारास लोणी खुर्दसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारांच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे कोलमडली. पिके आडवी झाली. लोणी खुर्द शिवारात गारांचा अक्षरशः सडा पडला होता.



 त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.‌ सलग दोन या परिसरातील गावे वादळी वाऱ्यासह गारपिटीने चांगलीच झोडपली गेली. विशेषतः गारपिटीने तालुक्यातील लोणी खुर्द गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या एकाच गावातील मोठ्या प्रमाणावर पिके भुईसपाट झाली आहेत. यामध्ये कांदा गहू व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदे ७० टक्क्यांपेक्षा जास्त उध्वस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांकडून हिरावला गेल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 



दुसऱ्या दिवशीही झोडपले 


वैजापूर तालुक्यात अनेक गावांत दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी धास्तावला.‌ तालुक्यातील डोंगरथडी भागात नायगव्हाण, लोणी खुर्द, टुणकी, कविटखेडा, बाभुळतेल, वळण, अंचलगाव आदी गावांत मंगळवारी वादळी वाऱ्यासह जवळपास पंधरा मिनिटे अवकाळीच्या सरी कोसळल्या होत्या. लोणी गाव व परिसरात गारा पडल्या.‌ दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील खंडाळा, धोंदलगाव, महालगाव या भागातही पाऊस पडला. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला आहे.




दोन दिवस गारपिटीसह झालेल्या पावसामुळे नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. याबाबत तंतोतंत आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. साधारणतः दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. 


- अशोक आढाव, उपविभागीय कृषी अधिकारी, वैजापूर 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top