मराठा आरक्षण विरोधी पोस्ट भोवली
मराठा आरक्षणाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकणे एका प्राध्यापकाला चांगलेच भोवले. वैजापूर शहरातील विनायक पाटील महाविद्यालयातील प्राध्यापकाने आरक्षणाविरुध्द पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने तसे पत्रही त्यांना दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाळल्यामुळे त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली. दरम्यान आमदार सतीश चव्हाणांच्या या कारवाईमुळे स्वपक्षातीलच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. येत्या निवडणुकीत चव्हाणांना 'जागा' दाखवून देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
डाॅ. सुरेश घुमटकर असे बडतर्फ करण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलने सुरू आहेत. प्रा. डॉ. सुरेश घुमटकर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात कार्यरत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळे ते चांगलेच वादात सापडले होते. डॉ. घुमटकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ११ सप्टेंबर २०२३ रोजी पोस्ट टाकली होती. त्यांच्या या पोस्टमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा ठपका ठेवण्यात येऊन अर्जुन धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर घुमटकर यांना मंडळाने निलंबित करून नोटीसही बजावली होती. नोटीस बजाविल्यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांची विभागीय चौकशी सुरू केली. या चौकशीत त्यांच्यावर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
काय आहे त्या पत्रात?
आपल्याविरुद्ध आरोपपत्रातील दोषारोपाप्रमाणे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये आपणावर केलेले गैरवर्तणूकीचे आरोप सिध्द झाल्यावरून आपणास सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये ? याचा खुलासा संदर्भीय कारणे दाखवा नोटीसद्वारे मागविण्यात आला होता. परंतु, आपण सादर केलेला खुलासा समाधानकारक नाही. त्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने आपणास विनायकराव पाटील महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक पदावरुन बडतर्फ करुन आपली सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला असून आपणास दि.१५/२/२०२४ पासून संस्थेच्या सेवेतून बडतर्फ करुन आपली सेवा समाप्त करण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सतीश चव्हाण यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले आहे. दरम्यान आमदार चव्हाण यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी घरचा आहेर दिला आहे.
समर्थनार्थ पोस्ट कशी चालते?
दरम्यान या कारवाईच्या पार्श्वभूमीवर येथील ओबीसी प्रवर्गातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून आमदार सतीश चव्हाण यांनी ही सूडबुध्दी व जातीयतेतून कारवाई केली आहे. डाॅ. घुमटकर हे ओबीसी प्रवर्गातील असल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मराठा समाजातील बहुतांश प्राध्यापकांनी समाज माध्यमांवर पोस्ट प्रसारित केल्या आहेत. ते भलेही समर्थनार्थ पोस्ट असेल. परंतु असे चालते का? एखाद्या संस्थेत काम करीत असताना आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट कशा खपवून घेतल्या जातात? असा सवालही संतप्त कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
आमदार सतीश चव्हाण यांनी ही जातीयतेतून कारवाई केली. त्यांच्या समाजातील बहुतांश प्राध्यापकांनी समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या. त्यांच्यावर कारवाई का नाही करण्यात आली? घुमटकर ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे येत्या निवडणुकीत चव्हाणांना त्यांची जागा दाखवून देऊ.
- ज्ञानेश्वर घोडके, प्रदेश उपाध्यक्ष, ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस, वैजापूर