तीन वेगवेगळे अपघात
तीन वेगवेगळ्या झालेल्या अपघातांत एकजण जागीच ठार तर अन्य पाचजण जखमी झाले. एका घटनेत कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार व अन्य एक गंभीर जखमी झाला. दुसर्या एका घटनेत नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर वैजापूर शहरालगतच्या तालुका कृषी अधिकारी कार्याजवळ आयशर व ओम्नीच्या धडकेत दोघेजण जखमी झाले. तिसऱ्या घटनेत पादचाऱ्याला दुचाकीने धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. या घटना १ मार्च रोजी घडल्या.
गणेश नामदेव पगार (वय २३ रा. वैजापूर) असे अपघातातील मृताचे नाव असून आशिष रवींद्र जगताप (२६ रा. वैजापूर ) असे जखमीचे नाव आहे. दुसऱ्या अपघातातील जखमींचे नावे मात्र कळू शकली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश पगार व आशिष जगताप हे दोघेजण दुचाकीवरुन नागपूर-मुंबई महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेहून वैजापूरकडे येत होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या कारने त्यांना धडक दिल्याने गणेश पगार हा जागीच ठार झाला तर आशिष जगताप हा गंभीर जखमी झाला.
ही घटना नागपूर-मुंबई महामार्गावरील तालुक्यातील शिवराई फाट्यानजीक १ मार्च रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी गणेश पगार यास तपासून मृत घोषित केले. आशिष याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आयशर - कारची धडक
दुसऱ्या घटनेत वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाजवळ ओम्नी कार व आयशरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात महिला व चालक जखमी झाले आहे. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरहून खंडाळ्याच्या दिशेने जात असलेल्या ओम्नी कारची खंडाळ्याच्या दिशेहून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या आयशरशी धडक झाली.या अपघातात ओम्नीमधील महिला व चालक हे दोघे जखमी झाले. या अपघातातील जखमी महिलेला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तिच्यावर उपचार सुरू आहेत तर चालकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नावे मात्र कळू शकली नाही.
दुचाकीने पादचाऱ्याला उडविले
तिसऱ्या घटनेत भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने यात दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील शहरानजीकच्या रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ १ मार्च रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. विलास राठोड (४५ रा. मंठा जि. जालना ) असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे तर जखमी दुचाकीस्वाराचे नाव मात्र कळू शकले नाही. विलास राठोड हे गंगापूर रस्त्याने पायी जात असताना दुचाकीने धडक दिल्याने ते जखमी झाले. त्यांना प्रीतम बिऱ्हाडे यांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे तर जखमी दुचाकीस्वारावर वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.