Nationalist Congress Party | राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर; नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्याच तक्रारी

0

 

पक्षात ताळमेळ नसल्याची खंत 




नेत्यांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ राहीला नाही. पक्षात नेत्यांचे वेगवेगळे गट पडल्याने गटबाजीने शिरकाव केला आहे. एकमेकांच्या कार्यक्रमांना न बोलावता डावलले जाते. अशा असंख्य तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसह पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केल्या. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ( अजित पवार) गटबाजी उफाळून आल्याचे बघावयास मिळाले.




वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना कल्याण आखाडे व्यासपीठावर कैलास पाटील, पंकज ठोंबरे, विजय पवार, प्रताप निंबाळकर, ज्ञानेश्वर घोडके आदी.




वैजापूर शहरातील सूरज लाॅन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, जे. के. जाधव, पंकज ठोंबरे, अॅड. प्रताप निंबाळकर, विजय पवार, दत्तू त्रिभुवन, बाळासाहेब भोसले, ज्ञानेश्वर घोडके, दिगंबर मोरे, विशाल शेळके आदींची यावेळी उपस्थिती होती. मेळाव्यात प्रारंभीच कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेत्यांच्याच तक्रारी करून त्यांना चांगलेच तोंडघशी पाडले. सर्वांनीच खदखद व्यक्त करून संतापाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे व्यासपीठावरील नेतेमंडळीही चांगलेच आवाक झाले. त्यामुळे हा मेळावा आहे की तक्रारींचा पाढा? असा प्रश्नही त्यांना पडला. 



दस्तूरखुद्द पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पवार यांनी पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद व हेवेदावे असल्याचे सांगून सर्वांचाच बुरखा फाडला. जे. के. जाधवांनी अतिरिक्त 'उद्योग' बंद केले पाहिजे. ते सक्षम व पोक्त आहेत. त्यामुळे त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. असा टोला दत्तू त्रिभुवन यांनी लगावला. जाधव यांनीही व्यासपीठावर एक बोलायचे अन् मागे एक बोलायचे. माझे छायाचित्र बॅनवरून डावलले जातात. वेगवेगळे गट असल्याचे सांगून काहीजण कार्यकर्त्यांची दिशाभूल करीत असल्याचा टोला ठोंबरेंना हाणला. पंकज ठोंबरेंनी पलटवार करीत जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असताना ग्रामीण भागात ते दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवतात. परंतु स्वपक्षातीलच कार्यकर्त्यांना भेटत नाही. याशिवाय ओबीसी सेलचे ज्ञानेश्वर घोडके, अमृत शिंदे व अन्य बहुतांश कार्यकर्त्यांनी तक्रारी करून खदखद व्यक्त केली. 



सर्वांचे ऐकून जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, पक्षात कुरबुरी चालूच असतात. आपल्या मनाप्रमाणे होत नसते. नेते व पदाधिकारी इथे बोलले ते बरे झाले. परंतु बाहेर प्रदर्शन करू नका. असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त झालेच पाहिजे. मतमतांतरे असू शकतात. इथे जमलेले अनेक घरांतील आहेत. सामोपचाराने प्रश्न सोडवू या. अजित पवार व पक्षाची ताकद वाढवा. पद, प्रतिष्ठा सर्वांनाच मिळेल. लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. गटबाजी चव्हाट्यावर न आणता एकत्र येऊन पक्ष बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यास पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




भाजपसोबत जाण्याचे कारण काय? 


दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी असताना काहीजणांनी वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली. असे व्हायला नको होते. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधायला पाहिजे होता. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुद्दामहून निदर्शनास आणून देत आहे. यापुढेही नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात घेतले पाहिजे. असे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी यावेळी सांगितले. 




दोन्हीही गट भिडले 


स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत. खूप दिवसांनंतर वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाल्याने दोन्ही गटांतील नेते व पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात भिडले. कुणीही मुलाहिजा न ठेवता एकमेकांचा बुरखा फाडण्यासाठी इरेला पेटले होते. पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड झाली तरी मला बोलाविण्यात आले नसल्याची खंत ठोंबरेंनी व्यक्त केली. ठोंबरे व जाधव या दोघांसह त्यांच्या गटांतील पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांच्या 'उखाळ्यापाखाळ्या' करण्यात कुठेही मागे नव्हते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top