Love marriage | क्रौर्य: आधी धडक देऊन उडविले..नंतर जीपच अंगावर घालून चिरडले

0

तरुणाचा जीपखाली चिरडून खून




मुलीला पळवून नेऊन तिच्यासोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाच्या नातेवाईकांच्या दुचाकीला धडक देऊन त्याला आधी उडविले, नंतर जीप वळवून आणत त्याला जीपखाली चिरडले. अंगावर शहारे आणणारी ही घटना २८ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंदूरवादा ते सावखेडा रस्त्यावरील राष्ट्रमाता शाळेजवळ घडली. दरम्यान ४ एप्रिल रोजी मृत तरुणाचे लग्न होणार होते. परंतु बोहल्यावर चढण्याच्या आधीच त्याला संपविण्यात आले.




मृत पवन मोरे


पवन शिवराम मोरे (२६) असे मयत तरुणाचे नाव आहे तर सचिन भागचंद वाकचौरे (रा. धुपखेडा, ता.पैठण) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम मोरे ( ४३  रा. ओझर ता. गंगापूर ) यांच्या भाच्याने सचिन भागचंद वाकचौरे (रा. धुपखेडा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर )  याच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. याचा राग सचिनच्या मनात होता. शिवराम मोरे हे त्यांच्या मुलासह मोटारसायकलवरून ( क्रमांक एमएच २० जीयू ४९४४ )  स्वतःच्या गावी ओझरला जात असताना सचिन वाकचौरे याने बोलेरो जीपने (क्रमांक एम एच २० ई वाय ०६४५ )  त्यांचा पाठलाग करून शेंदूरवादा ते सावखेडा रस्त्यावरील राष्ट्रमाता शाळेजवळ  २८ मार्च रोजी बारा  वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. 



त्यामुळे शिवराम मोरे व त्यांचा मुलगा पवन शिवराम मोरे  (२६) हा उंच उडून रस्त्यावर पडले. मारेकऱ्यांनी पुढे जाऊन जीप गाडी वळवून आणली व पुन्हा शिवराम मोरे यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावर पडलेल्या पवनच्या डोक्यावरून चाक घालून त्याला गाडीखाली चिरडून जागीच ठार केले. शिवराम मोरे यांच्या फिर्यादीवरून सचिन भागचंद वाकचौरे याच्यासह पाच जणांविरुद्ध खूनासह  विविध कलमान्वये वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा ( ता. गंगापूर  ) दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top