वैजापुरात ३८ हजारांची दारू जप्त
'ड्राय डे'ला वैजापूर शहरातील लाडगाव रस्त्यावरील झगडा फाट्यावर दारूची अवैध विक्री करणाऱ्यास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाने पकडून ३८ हजार रुपये किंमतीची देशी दारू पकडली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलिस अधीक्षक कार्यालयातील पथकाने वैजापूर शहरातील लाडगाव रस्त्यावर ३८ हजारांचा मद्यसाठा जप्त केला. |
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या आदेशानुसार वैजापूर हद्दीत अवैध धंद्याची कारवाई करीत असताना शहरातील लाडगाव रस्त्यावर एकजण दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन छापा टाकला असता आशिष सुनिल शिंदे(रा. आण्णाभाऊ साठेनगर) हा त्याच्या घराच्या बाजूला अवैधरित्या देशी दारुची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याकडून २१,५००/- किंमतीच्या १८० एमएलच्या २१५ बाटल्या व १७,२५०/- किंमतीच्या ९० एमएलच्या ३४५ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे चार ठिकाणी छापे
वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून चार जणांच्या ताब्यातुन बेकायदेशीर विक्रीसाठी बाळगलेला देशी व विदेशी दारुचा साठा हस्तगत केला. यात ४७ देशी - विदेशी दारुच्या १८० मिलीच्या बाटल्या व प्लास्टिकच्या कॅनमधील ५० लिटर गावठी दारुचा समावेश असून या साठ्याची किंमत साडेसहा हजार रुपये आहे.
तालुक्यातील म्हस्की येथे गोकुळ सोमवंशी याच्या ताब्यातून एक हजार ५० रुपये किमतीच्या १५ देशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. शनिदेवगाव येथे विशाल चंद्रभान पवार याच्याकडून एक हजार १२५ रुपये किमतीच्या १५ दारुच्या बाटल्या, अव्वलगाव येथे सुधीर अण्णा बर्डे याच्याकडून तीन हजार रुपये किमतीची ५० लिटर गावठी दारु व डागपिंपळगाव येथे रवी अशोक लिभोरे याच्याकडून एक हजार ५०० रुपये किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिपक औटे व सागर शिंदे यांच्या फिर्यादीवरुन वीरगाव पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांनी आणखी ठिकाणी छापे टाकून दारू पकडली.