वैजापूर येथील न्यायालयाचा निकाल
महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून लाठ्याकाठ्यांसह लोखंडी गजाने मारहाण करून एका ६५ वर्षीय वृध्दाचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने वैजापूर तालुक्यातील वाघला येथील बापाला जन्मठेप तर मुलाला कैदैची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान संशयावरून अन्य आठ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
भिकन गिरजाबा पठारे याला जन्मठेप तर समाधान भिकन पठारे ( दोघे रा. वाघला ता. वैजापूर) याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कारभारी बाळाजी पठारे (६५ रा. वाघला ता. वैजापूर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता बाबासाहेब पठारे हिने हेमंत पठारे याच्याविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरून शिवाजी पठारे यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांना हेमंत पठारे व अन्य नऊ अशा एकूण दहा जणांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन लाठ्याकाठ्यांसह लोखंडी गजाने मारहाण केली.
या घटनेत कारभारी बाळाजी पठारे यांच्या डोक्यात मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांना प्रथम शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना ७ आॅगस्ट २००८ रोजी तालुक्यातील वाघला येथे घडली होती. दरम्यान याप्रकरणी शिवाजी पठारे (४० रा. वाघला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत गिरजाबा पठारे, भिकन गिरजाबा पठारे, समाधान भिकन पठारे, सखाहरी गिरजाबा पठारे, संगीता हेमंत पठारे, मथुरा भिकन पठारे, वंदना सखाहरी पठारे, रुख्मनबाई सखाहरी पठारे ( सर्व रा. वाघला), नवनाथ अंबादास बागुल (रा. सावखेडा) व गोरख भिकाजी बागुल ( रा. पिंपळगाव) या दहा जणांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान फौजदार व्ही. जी. कसले यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. यात जखमी लहानू पठारे यांच्यासह लक्ष्मीबाई पठारे, बाबासाहेब पठारे व डाॅक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी भिकन गिरजाबा पठारे याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा तर समाधान भिकन पठारे याला कलम ३२४ अन्वये दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. संशयावरून अन्य आठ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील कैलास पवार खंडाळकर यांनी काम पाहिले.
छायास्त्रोत - गुगल