वैजापूर येथील न्यायालयाचा निर्णय
चोर असल्याच्या संशयावरून जबर मारहाण करून एकाच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या तिघांना वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
उमेश कडूबा गवळी (३०), ताराचंद बालचद गवळी (३५) व अर्जुन भावराव गवळी रा.गवळीशिवरा ता. गंगापूर असे शिक्षा सुनविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, फत्तू भिकन शहा (४० रा. काजी गल्ली देवगाव रंगारी ता.कन्नड ) हे २०१७ मध्ये फळे व भाजीपाला विक्री व्यवसाय करत होते. १० फेब्रुवारी २०१७ रोजी फत्तू हे त्यांच्या मोटारसायकलने देवगाव येथून लासूरस्टेशन मार्गे गाजगाव येथे जात होते.
दरम्यान लघुशंका व शौचास आल्याने ते गवळीशिवरा येथे एका शेतवस्तीजवळ थांबले. त्या ठिकाणी ते पाण्याच्या शोधात एका झोपडीजवळ गेले. नेमके याचवेळी त्याठिकाणी उमेश, ताराचंद व अर्जुन गवळी हे तिघे आले व त्यांनी फत्तू यांच्यावर ठिबक पाईप चोरीचा संशय घेत जबर मारहाण केली. या मारहणीत फत्तू शहा हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फत्तू शहा यांनी दिलेल्या जवाबावरून तिघांविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे अॅड. नानासाहेब जगताप यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. पैकी त्यात मयत फत्तू शहा भिकन शहा यांचा मृत्यूपूर्वीचा जवाब, डॉ. रंगनाथ तुपे व डॉ. प्रमोद अल्हाट, हरिचंद नरके व तपासिक अंमलदार सुर्यकांत कोकणे याच्या साक्ष महत्वाची ठरली. सर्व साक्ष पुरव्याच्याआधारे अतिरिक्त व जिल्हा व सत्र न्यायधीश एम मोहिउद्दीन एम. ए. यांनी खटल्याचा निकाल देत उमेश, ताराचंद व अर्जुन गवळी या तिघांना सात वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड न भरल्यास तीन वर्षे साध्या कारावसाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. नानासाहेब जगताप यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सागर विघे यांनी कामकाज बघितले.