Rainfall Update | हवामान विभागाची नवी आकडेवारी; जिल्ह्याच्या पर्जन्यमानात वाढ

0

वैजापूर तालुक्यात ८५ मि.मी. भर 


 


राज्यात गेल्या वर्षात पडलेल्या पावसाचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाच्या (पुणे) कार्यालयाने जिल्ह्याचे वर्षभरासाठी  नवे पर्जन्यमान निश्चित केले आहे. सद्या ग्राह्य धरल्या जाणाऱ्या पर्जन्यमानाच्या सरासरीत तब्बल चौदा वर्षानंतर यंदा बदल झाला आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यात पावसाच्या सरासरीतही ८५ मि.मी.ची वाढ झाली आहे. यापुढे तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान आता ६२५ मि.मी. एवढे राहणार आहे. नव्याने निश्चित करण्यात आलेली सरासरीच यापुढे पूर, दुष्काळ जाहीर करण्यासाठी ग्राह्य धरल्या जाणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान वाढले आहे. सरासरी पर्जन्यमान वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


 





पावसाळ्यात सरासरी पडणाऱ्या पावसावरच दुष्काळाची स्थिती अवलंबून असते. त्यासाठी राज्यभरात जिल्हा व तालुकानिहाय पडणाऱ्या पावसाचे सरासरी प्रमाण ग्राह्य धरून दुष्काळाचे निकष जाहीर करण्यात येतात. मान्सूनकाळात शासनाकडून तयार होणारा पर्जन्यमान अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार करण्यात येणारे पर्जन्यमान अहवाल हे सरासरी पर्जन्यमानावर आधारित तयार केले जातात. यासाठी सन २०१० मध्ये शासनाने जिल्हा व तालुकानिहाय पर्जन्यमानाची सरासरी प्रमाण ठरवून दिले होते.


 त्याच आधारे दुष्काळ, पूर परिस्थिती जाहीर करून कृषी विषयक धोरणे ठरविली जात होती. त्यामुळे या आकडेवारीला विशेष महत्व होते. मात्र अलीकडे पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे चौदा वर्षांपासून असलेल्या सरासरीत सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी भारतीय हवामान विभागाच्या (पुणे) कार्यालयाने  तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा अभ्यास केला. या पर्जन्यमानाचे विश्लेषण करून नवे निष्कर्ष जाहीर केले आहे. 


त्यानुसार तालुका व जिल्हानिहाय पर्जन्यमानाची नवी सरासरी निश्चित करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयाकडून पर्जन्यमानाच्या सरासरीची प्राप्त झालेली ही आकडेवारी आधारभूत म्हणून वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरातील अपेक्षित सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आले आहे. 


 

अगोदर किती होते पर्जन्यमान?


दरम्यान वैजापूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान यापूर्वी ५४०.८५ मि.मी. होते. आता हे पर्जन्यमान ६२५ मि.मी. एवढे झाले आहे. तालुक्यात गेल्या चार वर्षात पावसाचे प्रमाण पाहता ते वाढत गेले. या काळात तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाउस झाला होता. काही दिवसांत १००० मि.मी. पर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे वार्षिक सरासरीमध्ये वाढ झाली आहे.



वैजापूरचे निश्चित झालेले प्रतिमाह पर्जन्यमान असे-          


जानेवारी (१.८३ मि.मी.), फेब्रुवारी (१.०६), मार्च (०.९१), एप्रिल (१.४२), मे (१२.९७), जून (१०२.६१), जुलै (१०६.५३), ऑगस्ट (९४.६०), सप्टेंबर (१३७.८५), ऑक्टोबर (५१.३८), नोव्हेंबर (२१.७४), डिसेंबर (७.९५ ), एकूण सरासरी ६२५ मि.मी. 


जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान नवीन सरासरी अशी-


छत्रपती संभाजीनगर ७६४.२०, पैठण  ६७४.१४, गंगापूर ६६३.१४, वैजापूर ६२५, कन्नड ६७२.७२, खुलताबाद ७९७.८६, सिल्लोड ६७१.६१, सोयगाव ८०१.४९ व फुलंब्री ६०४.३० असून जिल्ह्याचे एकूण सरासरी पर्जन्यमान ६९७ मि.मी. एवढे झाले आहे.




माझ्या माहितीप्रमाणे, हवामान विभागाकडून दर पाच वर्षांनी सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी निश्चित केली जाते. दरवर्षीच्या सरासरी पावसावर हे अवलंबून असते. या विभागाशी आमचा संबंध नसतो. परंतु आकडेवारी आम्हाला कळविली जाते. गेल्या चार वर्षांत वैजापूर तालुक्यात पर्जन्यमान चांगले आहे. यंदापासून हवामान विभागाने वैजापूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६२५ मि. मी. निश्चित केले आहे.


- व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर 


छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top