आचारसंहितेचे पालन करा
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान निवडणुकीत काळात कुठल्याही सभा अथवा तत्सम परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक खिडकी योजनेंतर्गत परवानगी मिळणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
वैजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी सोबत पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात महक स्वामी व पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना स्वामी यांनी सांगितले की, १६ मार्चपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी कोणत्याही धर्मांच्या प्रार्थनास्थळांचा प्रचारासाठी वापर करू नये, वैयक्तिक टीका टिप्पणी टाळावी व मतदारांना प्रलोभने देऊ नयेत. कुणालाही असे काही आढळल्यास नागरिकांनी १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. तसेच तर सी- व्हिजील (c-vigil) या मोबाईल ॲपवर देखील नागरिकांना ऑनलाईन तक्रार करता येणार आहे.
याशिवाय या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस व महसूल विभागाचे दहा संयुक्त भरारी पथकेही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक काळात वैजापूर, शिऊर व वीरगाव या तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तर ९० गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील कार्यरत राहणार आहे. प्रचार रॅली अथवा नेत्यांसोबत केवळ दहाच वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. या परवानगी असलेल्या वाहनांना विशेष बॅच असणार आहे. दारूसह पैशांची खैरात करणाऱ्यांवर आमची विशेष नजर असणार आहे. जागेसाठी नाहरकत व भोंग्यासाठी परवानगी आवश्यक आहे.
याशिवाय जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खामगाव व कोपरगाव रस्ता व जांबरगाव टोलनाक्यावर चेकपोस्ट असणार आहे. राजकीय बॅनर लावताना संबंधित जागा मालकाची परवानगी आवश्यक आहे. तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बहुतांश परवानग्या महसूल व पोलिस संयुक्तपणे देतील. सभास्थळांबात ज्यांचा अर्ज अगोदर येईल. त्यांना प्राधान्य दिले जाईल. सार्वजनिक जागा सर्वांसाठीच उपलब्ध असणार आहे. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुध्द पोलिस कठोर कारवाई करतील. असा इशाराही स्वामी यांनी दिला आहे.
गुन्हेगारांवर लवकरच कारवाई
या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे तडीपारींचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी त्यावर निर्णय येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
शस्त्रे जमा करण्याचे काम सुरू
दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्र वापरणाऱ्यांकडून शस्त्र जमा करण्यात येत आहे. वैजापूरसह वीरगाव व शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश शस्त्रे जमा करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.