ब्रेक फेल झाल्याची मारली थाप
मालवाहतूक करणाऱ्या चालकाने वाहनातील मालाचा अपहार केल्याच्या आरोपाखाली चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चालकाने माल चोरी झाल्याची मखलाशी करून ३ लाख २४ हजारांच्या मालाची हेराफेरी करीत चुना लावला.
मधुकर दामु साबळे (रा.सिद्धिविनायक अपार्टमेंट,श्रमिकनगर, सातपूर नाशिक ता.जि. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद आमटे (रा. गट नं.१३ प्लॉट नं.२९, वडगावकोल्हाटी ता.जि. छ. संभाजीनगर) यांचा ट्रान्सपोर्टींगचा व्यवसाय आहे. २७ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी एमआयडीसी वाळूज येथून आरएसपीएल लिमिटेड कंपनीतून घडी डिटर्जंट पावडर, एक्सपर्ट डिश वॉशचा पाच लाख १२ हजार ८१३ रुपये किंमतीचा माल ट्रान्सपोर्टला आलेल्या वाहनात (क्रमांक एमएच १५ ईजी १९७६) भरून दिला.
हा माल नाशिक येथील नवदीप एटरप्रायजेस, शिवा एजन्सी व विनायक डिस्ट्रिब्युटर या तीन ठिकाणी द्यावयाचा होता. यावेळी त्यांनी वाहनचालकाला वाहतूक भाड्यापोटी सहा हजार ५०० रुपये देखील दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या सुमारास मधुकर साबळे याने प्रमोद यांना फोन लावून कळविले की, 'नागपूर-मुंबई हायवे रोडने जात असताना लासूरस्टेशन पुढील करंजगाव जवळील वळणावर माझ्याकडील आयशर गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे गाडी रोडच्या खाली जावून आयशरमधील माल चोरीला गेला आहे'. ही माहिती मिळताच प्रमोद यांनी लगेचच त्या ठिकाणी धाव घेतली. सकाळी साडेनऊ वाजता ते घटनास्थळी पोहचले असता वाहन रोडच्या बाजूला गेलेले दिसत होते. यावेळी तेथे चालक न दिसल्याने त्यांनी त्याला फोन लावला. थोड्यावेळाने चालक गाडीजवळ आला व त्याने 'रात्री आयशरचे ब्रेक फेल झाल्याने आयशर रोडच्याखाली गेले होते व रात्री आयशरमधील माल चोरीला गेला आहे' असे सांगितले.
याबाबत प्रमोद यांनी त्यांच्या सोबत असलेले इरफान पटेल यांच्यासह परिसरामध्ये माहिती घेतली. परंतु गाडीचे कोणत्याही प्रकारे ब्रेक फेल नसून गाडी सुस्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गाडीतील मालाची पाहणी केली असता गाडीमधील माल हा अस्ताव्यस्त पडलेला होता त्यामध्ये कंपनीत भरलेल्या ५ लाख रुपये किंमतीच्या मालापैकी १ लाख ८७ हजारांचा माल शिल्लक राहिला तर उर्वरित ३ लाख २४ हजार ९३१ रुपये किंमतीचा माल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान उर्वरित मालाचा चालकाने अपहार केल्याबाबत त्यांनी वैजापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहे.
छाया स्त्रोत - गुगल