अगरसायगाव येथील घटना
'तुझ्या नवऱ्याने आमच्याकडून पैसे घेतले आहे. तू आमच्यासोबत चल' असे म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाल्मिक जाधव, अनिकेत जाधव, दिनेश वगदे व प्रेमसिंग शेरे (सर्व रा.अगरसायगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित महिलेचे पतीसोबत काही दिवसांपूर्वीपासून वाद सुरू असल्याने ती आपल्या मुलासह पतीपासून विभक्त राहते. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिचा पती तिच्या घरी आला व 'तू येथे कुणाच्या भरवशावर राहते' असे म्हणून तिला शिवीगाळ करून तिथून निघून गेला.
दरम्यान रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पीडितेच्या भ्रमणध्वनीवर कॉल आला. महिलेने कॉल रिसीव्ह करून 'कोण बोलत आहे ?' अशी विचारणा केली. त्यावर समोरच्या व्यक्तीने 'वाल्मिक जाधव बोलतोय, तू दार उघडून घराबाहेर ये मला तुझ्यासोबत बोलायचे आहे' असे म्हटला. त्यामुळे पीडिता घराबाहेर आली. त्या ठिकाणी वाल्मिक जाधव, अनिकेत जाधव, दिनेश वगदे व प्रेमसिंग शेरे हे आलेले होते. महिलेने त्यांना 'काय काम आहे ?' अशी विचारणा केली. 'तुझ्या नवऱ्याने आम्हा चौघांकडून पैसे घेतलेले आहे. तुला आमच्यासोबत चालावे लागेल' असे म्हणून त्यांनी तिचा हात पकडून ओढले. परंतु महिलेने 'मी पोलिस स्टेशनला फोन लावते' असे म्हटल्याने चौघांनी तिथून धूम ठोकली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छायास्त्रोत - गुगल