Cheque Bounce | Apmc Onion Market: 'त्यांनी' कांदे दिले, 'ह्यांनी' लाखांचे चेक 'बाऊन्स' केले

0

रोख द्यावी लागली रक्कम 



वैजापूर शहराबाहेरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. शेतकऱ्यांनी मार्केटमधील अडत व्यापाऱ्याला कांदे विकले खरे ; परंतु कांदा विक्रीपोटी शेतकऱ्यांना दिलेले ८ लाखांचे धनादेश वटलेच नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान याबाबत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याने अडत व्यापाऱ्यावर रोख स्वरूपात रक्कम चुकती करण्याची नामुष्की ओढवली.








याबाबत अधिक माहिती अशी की, शहराबाहेरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट आहे. सध्यस्थितीत हे मार्केट आठवड्यातील सातही दिवस चालू असते. या मार्केटमध्ये गोणी व मोकळा कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीने वेगवेगळे वार ठरवून दिले आहेत. कांदा मार्केटमधील जयसदगुरू ट्रेडिंग कंपनीने शेतकऱ्यांकडून गेल्या आठवड्यातच कांदा खरेदी करून त्यापोटी धनादेश दिले होते. परंतु शेतकऱ्यांनी धनादेश बँकेत टाकल्यानंतर ते वटलेच नाही. बँकेतून त्यांना सांगण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी धनादेश घेऊन बाजार समितीकडे तक्रारी केल्या. जवळपास १० ते १५ शेतकऱ्यांचे एकूण आठ लाखांपेक्षा जास्त रकमेचे धनादेश होते. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर जयसदगुरू ट्रेडिंग कंपनीचे विलास रोहोम यांनी त्यांच्या माणसांमार्फत रक्कम पाठवून शेतकऱ्यांना चुकती केली. त्यानंतर वातावरण निवळले. दरम्यान लिलावात भावावरून कांदा मार्केटमध्ये नेहमीच राडा होत असतो. याशिवाय चेक बाऊन्सचे प्रकारही यापूर्वी अनेकवेळा घडलेले आहेत. परंतु बाजार समिती प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी बाजार समितीने कठोर पावले उचलावीत. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 




काय आहे नियम?


गेल्या काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धनादेशाबाबत अडत व्यापाऱ्यांचे कान टोचण्यात आले होते. धनादेश बाऊन्स प्रकरणे वाढत चालल्याने बाजार समितीने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्याच दिवसाचा ( सेम डे) धनादेश देण्याचे आदेश दिले होते. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना सेम डेचा धनादेश बंधनकारक असतांनाही अडत व्यापाऱ्यांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे. बहुतांश व्यापाऱ्यांचे धनादेश बाऊन्स होत असताना फारसी हक ना बोंब होत नाही. परिणामी झाकली मूठ सव्वा लाखाची राहते.




शेतकऱ्यांना कांदा विक्रीपोटी दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याचे प्रकरण आम्हालाही ऐकावयास मिळाले. जवळपास १० ते १५ शेतकऱ्यांचे पैसे अडत व्यापाऱ्याकडे अडकले होते. परंतु व्यापाऱ्याने ही रक्कम रोख स्वरूपात चुकती केली.


- चंचल मते, कर्मचारी, कांदा मार्केट, वैजापूर




कांदा खरेदीपोटी शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे दिलेले धनादेश वटले नाही. ८ ते १० शेतकऱ्यांचे एकूण आठ लाख रुपयांचे हे धनादेश होते. शेतकऱ्यांना रोख स्वरूपात रक्कम देण्यात आली.आता कुणाचीही तक्रार नाही. 


- विलास रोहोम, अडत व्यापारी, वैजापूर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top