दुसरा भामटा अजूनही फरारच
तोतया सरपंच व ग्रामसेवकाने बनावट कागदपत्रे बँकेला सादर करून वैजापूर तालुक्यातील वीरगाव - मुर्शदपूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या खात्यावरून मजुरांचे ६४ लाख रुपये हडप करण्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. याप्रकरणी दोघांविरुद्ध वीरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तोतया सरपंच अखेर पोलिसांना शरण आला आहे.
भरत शिवाजी कदम रा. वीरगाव असे शरण आलेल्या तोतया सरपंचाचे नाव आहे तर महेश तुकाराम पवार असे तोतया ग्रामसेवकाचे नाव असून तो अजूनही फरारच आहे. वैजापूर तालुक्यातील वीरगाव - मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यावरून बनावट कागदपत्रे सादर करून तोतया सरपंच भरत शिवाजी कदम व तोतया ग्रामसेवक महेश तुकाराम पवार या दोघांनी जवळपास ६४ लाख रुपये परस्पर काढून हडप केले.
तोतया सरपंच भरत कदम |
याबाबत विद्यमान सरपंच मनीषा थोरात यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह बँक व्यवस्थापकाकडे तक्रार केली होती. तक्रार करूनही हे प्रकरण भिजत पडले होते. याशिवाय ग्रामसेविका सोनाली शेटे यांनी वीरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देऊनही हा गुन्हाच तांत्रिक लालफितीत अडकल्याने तब्बल आठ दिवसानंतर हा गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. याप्रकरणी तोतया सरपंच भरत शिवाजी कदम व तोतया ग्रामसेवक महेश तुकाराम पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस 'दप्तरी' होते फरारच
दरम्यान ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच तब्बल दीड महिन्यापासून पोलिस 'दप्तरी' हे दोघेही फरारच होते. वास्तविक पाहता भरत कदम हा वैजापूर शहर व वीरगावात भरदिवसा उजळ माथ्याने फिरत असता तो पोलिसांना मात्र सापडत नव्हता. हे विशेष. त्यामुळे ते खरंच सापडतननव्हते की पोलिसांनीच त्यांना फरार घोषित केले होते. हे मात्र गुलदस्त्यात आहे. मंगळवारी भरत कदम हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला तर महेश पवार हा अजूनही फरारच आहे. दोनच दिवसांपूर्वी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय आहे नेमके प्रकरण?
वीरगाव - मुर्शदपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते असून भरत कदम व महेश पवार या दोघांनी तोतया सरपंच व ग्रामसेवक होऊन बनावट कागदपत्रे सादर केले होते. ६४ लाखांची रक्कम त्यांनी परस्पर दुसऱ्यांच्या म्हणजेच सहा ते सात जणांच्या नावावर काढून हडप केली. विशेष म्हणजे रक्कम काढल्यानंतर विद्यमान सरपंच व ग्रामसेविकेला या बाबीची भणक देखील नव्हती. तक्रार झाल्यानंतर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या.
न्यायालयाने जामीन नाकारला
दरम्यान या पार्श्वभूमीवर भरत कदम व महेश पवार या दोघांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. तेथेही अर्ज नामंजूर झाल्याने अखेर कदम याला याच्यावर पोलिसांना शरण जाण्याची नामुष्की ओढवली.