Dream MLA | Viral: लोकसभेआधीच लागले 'डोहाळे', '२०२४ चे फिक्स आमदार'

0

नेत्यांसोबत 'बडेजावपणा'



केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकताच वैजापूर दौरा केला. या दौऱ्याचा विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या काही भाजप नेत्यांनी 'अॅडव्हाटेंज' घेण्याचा प्रयत्न केला. दानवेंसोबत हेलिकॉप्टरमधध्ये आकाशभरारी घेऊन '२०२४ चे फिक्स आमदार' असे कॅपशन सोशल मीडियावर व्हिडिओला देत कल्पनांचे इमले रचले. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चेचा विषय ठरला आहे.






येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे देशात वातावरण तापू लागले. परंतु वैजापूर तालुक्यात लोकसभेच्या अगोदरच काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे 'कॅम्पेनिंग' सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे. त्याचे झाले की, गेल्या आठवड्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेलिकॉप्टरने कार्यक्रमानिमित्त वैजापूर तालुक्यात येऊन येऊन गेले. यावेळी स्थानिक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनीही हेलिकॉप्टरमध्ये बसायची 'हौस' करून घेतली. सोबतच असंख्य छायाचित्रे क्लिक करून व्हिडिओ क्लिप्स करून घेतल्या. ते निघून गेल्यानंतर आता क्लिक्स आणि व्हिडिओ नेत्यांचे 'अनुयायी' आता व्हायरल करून 'ढोल' बडवू लागले. 



२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'एकनाथी' कमळ 'चुरगळून' गेलेले असतानाही आता पुन्हा उभारी घेऊन ते 'फुलविण्याचा' प्रयत्न सुरू झाला. परंतु अगोदर लोकसभा निवडणूक होणार आहे. हे माहिती असतानाही त्यांनी विधानसभा निवडणुकीची कॅम्पेनिंग आताच सुरू करून आपल्या' 'चाणाक्ष' दर्शन घडविले आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिंदेसेनेच्या आमदारांकडे आहे. याशिवाय भाजपमध्येही आमदारकीसाठी मोठी स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत त्यांची 'डाळ' कुठपर्यंत शिजणार? हाही मोठा प्रश्न आहे. शिंदेसेनेला भेदण्यापूर्वी त्यांना स्वपक्षातीलच मोठ्या 'ब्रेकरचा' सामना करावा लागणार आहे.



 हे 'चक्रव्यूह' भेदल्यानंतर त्यांचा 'नबंर' लागला तर लागू शकतो. केवळ 'आठवडी' राजकारण करून 'साप्ताहिक' नेत्यांना मतदारांचा किती पाठिंबा असेल? याची जाणीव असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ वरिष्ठ नेत्यांसोबत हेलिकॉप्टरने आकाशात घिरट्या घालणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून विधानसभा कशी गाठता येईल? विधानसभा गाठायची म्हणजे' जमीनीवरच' राहवे लागेल. मतदारांनी एकदा 'अस्मान' दाखविलेले असतानाही काहींचा आकाशभरारी घेण्याचा छंद मात्र कायम आहे. 




आमदारकीचे 'दिवास्वप्न' रहायला नको 


दरम्यान राज्यात शिवसेना ( शिंदेगट) - भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) अशी महायुती आहे. स्थानिक मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तसेच भाजपमध्येही आगामी विधानसभा निवडणुकीत अनेकजण इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत '२०२४ चे फिक्स आमदार' अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून 'काड्या' ओवाळून टाकण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. या पोस्टमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये 'हसे' व्हायला सुरवात झाली आहे. मुळात विधानसभा निवडणुकीची अद्याप कोणतीही चर्चा अथवा सुतराम संबंध नसतानाही हेलिकॉप्टर आकाशात उडून केलेली' फिक्स आमदारकीची' घोषणा केवळ 'दिवास्वप्न' राहू नये म्हणजे झालं. सोशल मीडियावर टाकलेल्या या पोस्टवर मात्र खुमासदार चर्चा झडत आहेत.


छायास्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top