वर्षभराचा थकविला कर
वर्षभराचा २५ हजार रुपयांचा अकृषिक कर थकविणाऱ्या जीटीएल कंपनीला महसूल विभागाने चांगलाच दणका दिला आहे. कर थकल्यामुळे तलाठ्याने जीटीएल मोबाईल टॉवर कंपनीला सील ठोकल्याची कारवाई वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे २८ मार्च रोजी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील महालगाव येथील गट क्रमांक २१५ मध्ये जीटीएल कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. या टॉवरच्या अकृषिक करापोटी गेल्या वर्क्षभराची २५ हजार रुपये थकबाकी आहे. दरम्यान याबाबत कंपनीला दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजाविण्यात आली. मात्र याबाबत कंपनीकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही.
पंधरा दिवसापूर्वी देखील कराची रक्कम भरण्यासाठी संबंधिताकडे सूचित करण्यात आले होते. परंतु तरीही कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आले. अखेर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तलाठी एस. आर. पवार, अब्दुल शेख आदींच्या पथकाने या मोबाईल टॉवरला सील ठोकण्याची कारवाई केली.