मुंबईत होणार प्रवेशसोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्व. कैलास पाटील चिकटगावकर यांचे पुत्र अभय पाटील चिकटगावकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान एप्रिल महिन्यात मुंबई येथील एका शानदार कार्यक्रमात चिकटगावकर पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील चिकटगावकर होते. या निवडणुकीत शिवसेना - भाजपचे उमेदवार रमेश बोरनारे यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. निवडणुकीनंतर काही दिवसांनी माजी आमदार तथा काका भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याशी राजकारणातून खटके उडाल्यानंतर अभय चिकटगावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बरेच दिवस ते विजनवासात होते.
त्यानंतर त्यांनी थोडी उसंत घेऊन भारतीय जनता पक्षाचे 'कमळ' हाती घेतले. चिकटगावकरांनी स्थानिक भाजप नेत्यांना सोबत न नेता एकटे जाऊन मुंबईत हा प्रवेशसोहळा उरकून घेतला. त्यामुळे भाजप नेत्यांनीही त्यांना फारसे 'जवळ' न करता दुरच ठेवले. चिकटगावकर भाजपमध्ये असतानाही असून नसल्यासारखेच होते. तेथे 'जम' बसत नसल्याचे पाहून चिकटगावकरांनी भाजपशी 'फारकत' घेत तेलंगणातील बीआरएसशी ( भारत राष्ट्र समिती) 'सूत' जुळवून घरोबा केला. तेथेही ते थोडे दिवस नांदले खरे, परंतु फार दिवस रमले नाही. दरम्यानच्या काळात बीआरएस अचानकच प्रकाशझोतात आल्याने राज्यातही या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. असे वाटत असतानाच तेलंगणा राज्यामधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीमुळे महाराष्ट्रातही हा पक्ष डुबत्या नावेसारखा झाला.
त्यामुळे चिकटगावकरांनी काळाची पावले ओळखून कुठले तरी राजकीय बॅनर हाताशी पाहिजे म्हणून आता पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्व. कैलास पाटील चिकटगावकर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. त्यामुळे धाकट्या चिकटगावकरांनीही आता जुनी वहिवाट चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय पुन्हा कितपत यशस्वी होतो ? हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
एक ना धड, भारोभार चिंध्या
दरम्यान स्थानिक पातळीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खंबीर व अष्टपैलू नेतृत्वाची गरज आहेच. सध्या पक्षाची परिस्थिती पाहता 'एक ना धड, भारोभार चिंध्या' अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे चिकटगावकर पक्षात कमबॅक करणार असतील तर पक्ष बळकटीला मोठा वाव मिळू शकतो.
चौथ्यांदा पक्षप्रवेश
अभय पाटील चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( विभाजनापूर्वीची), भारतीय जनता पक्ष, बीआरएस असे राजकीय मार्गक्रमण करीत आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरद पवार) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा चौथा प्रयोग आणखी कितपत यशस्वी होतो अन् जनता त्यांना कशी स्वीकारते? या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतीलच.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझा प्रवेश निश्चित आहे. शरद पवार यांची भेट घेऊन सर्व अडथळे 'दूर' केले. ३१ मार्च रोजी प्रवेशाची तारीख निश्चित होऊन एप्रिल महिन्यात साधारणतः पहिल्या आठवड्यात माझ्यासह समर्थकांचा प्रवेश होईल. शरद पवारांनी माझ्या कुटुंबाला मोठे केले. त्यामुळे पडत्या काळात मीही त्यांना खंबीर साथ देण्याचे ठरविले आहे. पक्षात प्रवेश झाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरवात करू.
- अभय पाटील चिकटगावकर