Case Of Murder | 'तो' पोलिस नेहमीच ठरला 'वादग्रस्त', नावात 'राम', प्रताप मात्र 'काळे'

0

अनेक 'कांड' करून हात केले 'काळे' 




वाळूज परिसरातील लघुउद्योजकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला निलंबित पोलिस कर्मचारी रामेश्वर काळे हा पहिल्यापासूनच उपद्व्यापी असल्याचे समोर आले आहे. वीरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असतानाही त्याने अनेक 'कांड' केलेले आहे. वाळूतस्करीच्या कलेक्शनसह बहुतांश प्रतापाने त्याचे हात 'काळे' झालेले आहेत. नावात जरी 'राम' असले तरी कृत्य मात्र नेहमीच वादग्रस्त राहीली आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस दलात 'सन्नाटा' पसरला आहे. 



वाळुज खूनप्रकरणातील निलंबित पोलिस रामेश्वर काळे




    वाळुज परिसरातील लघुउद्योजक सचिन साहेबराव नरोडे यांच्या डोक्यात गोळी झाडून खून केल्याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्यातील निलंबित पोलिस कर्मचारी रामेश्वर काळे व तालुक्यातील भग्गाव येथील त्याचा साथीदार लक्ष्मण जगताप या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेनंतर मारेकरी रामेश्वर काळे याच्या वेगवेगळ्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. स्थानिक पोलिस दल सुन्न झाले असले तरी त्याच्याबाबत अनेक किस्स्यांची चर्चा झडू लागली आहे. काळेचे गतकाळातील काही कारनामे पाहता तो किती वादग्रस्त होता. याची प्रचीती येते. वीरगाव पोलिस ठाणे म्हणजे खाती 'गव्हाण' मानले जाते. या गव्हाणीत तो 'मनमुराद' चरत असायचा. या ठाण्याच्या हद्दीत गोदावरीचे अख्खे वाळूपट्टे असल्यामुळे माफियांकडून जमा होणाऱ्या 'लक्ष्मी' कलेक्शनची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावरच सोपविलेली होती. त्यामुळे वाळूतस्करीच्या 'बरकतीच्या' धंद्यात काळे तरबेज होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांची' 'हुजरेगिरी' करीत असताना त्यांने ही' जबाबदारी' कित्येक दिवस सांभाळली. यातूनच त्याला त्याच्या अन्य सहकाऱ्यांची छुपी दुष्मनी मोल घ्यावी लागली. त्याचा स्थानिक काही 'टपोरींचा' गोतावळा पाहता तो खरच पोलिस आहे का? इथपर्यंत नागरिकांना संशय येत होता. परंतु म्हणतात ना.! 'दंडेलशाहीपुढे' सर्व काही धकले जाते. त्यामुळे सामान्य नागरिक बघून दुर्लक्ष करीत. सामान्य नागरिक काही गोष्टी डोळ्याने  'टिपत' असले तरी बोलायला धजावत नव्हते. काळेच्या बाबतीत एकाच शब्दात म्हणायचे तर ती 'अॅथोराईल्ड' दहशत होती. नागरिकांनी सहन केली तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले होते.




तहसीलदारांनी पकडलेले वाहन सोडले



 दरम्यान तत्कालीन तहसीलदार सुमन मोरे यांनी रात्रीच्या वेळी पकडून आणलेले वाहन वीरगाव पोलिस ठाण्यातून सोडून देण्याचा प्रताप काळेच्या नावावर आहे. याबाबत त्याने ना तत्कालीन ठाणेप्रमुखांना विचारले ना तहसीलदारांना. दस्तूरखुद्द मोरेंनी ते वाहन काळेच्या ताब्यात देऊन त्या वैजापूरकडे रवाना झाल्या होत्या. दुसऱ्याच कुणाचीही परवानगी न घेता काळेने ते वाहन स्वतःच्या हिमतीवर सोडून दिले. तहसीलदारांच्या तक्रारीनंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी या प्रकरणाची चौकशी लावली होती. 



लाचप्रकरणातही हात 'काळे' 


   

देशी दारू दुकानाचा परवाना रद्द न करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील एकाकडून ५०  हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी रामेश्वर काळेविरुध्द २५ जानेवारी रोजी रोजी  वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यावेळी काळे हा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. १८ डिसेंबर २०२२  रोजी रामेश्वर काळे याने टाटा सुमो गाडीत देशी दारूचे १२ बॉक्स घेऊन जात असताना वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडून वाहनातील दारुचे खोके व वाहन जप्त केले. कारवाई दरम्यान वाहनातील दोघांसह घटनेतील तक्रारदाराविरुध्द वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कारवाईनंतर काळे याने तक्रारदारास भ्रमणध्वनीवर संपर्क करून वैजापूर येथे बोलावून घेतले. यादरम्यान 'तुमचे विरुद्ध बेकायदेशीररित्या देशी दारू वाहतूक करण्याचा गुन्हा दाखल झाला असून तुमचा देशी दारू दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामार्फत पुढे पाठवायचा नसेल तर ५० हजार रुपये  रक्कम द्यावी लागेल'. अशी मागणी केल्याची तक्रार घटनेतील तक्रारदाराने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीच्या अनुषंगाने  १२ जानेवारी रोजी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वैजापूर येथे पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता रामेश्वर काळे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती  ३०  हजार रुपये  लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे सिध्द झाले होते. 




'खाकी'तील क्रूरकर्मा 


काळेसारखा पोलिसी खाकीत  'क्रूरकर्मा' वावरत असताना त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले गेले. काळे हा खाकीच्याआड 'कांड' करायचा. परिणामी तो सराईत गुन्हेगाराप्रमाणे एखाद्याच्या जिवावर उठून तो त्याचा 'गेम' करतो. माणूस शिक्षण घेऊन तो नोकरी करतो म्हणजे तो सुशिक्षित, समजूतदार होतोच असे नाही. हा समज काळेने फोल ठरविला आहे. त्यामुळे नैतिकता, अनैतिकता हे शब्द काळेपासून दूर आहेत. काळेसारखे माणसं पोलिस दलाला निश्चित कलंक म्हणावे लागेल.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top