१५००० मोबाईल ग्राहक; लॅंडलाईन फक्त ९००
एकेकाळी नंबर वन कंपनी म्हणून भारत संचार निगम लिमिटेडकडे ( बीएसएनएल ) पाहिले जात होते. परंतु मोबाईल कंपन्यांची स्पर्धा, त्या तुलनेत मिळणारी तोकडी सेवा, केंद्र सरकारची अनास्था, विविध कंपन्यांचे असलेले तगडे नेटवर्क, कर्मचाऱ्यांचा वाणवा, समस्यांचे निराकरण पाहता या स्पर्धेत बीएसएनएल मागे पडल्याने ग्राहक आता याकडे पाठ फिरू लागले आहे. वैजापूर तालुक्यात बीएसएनएलचे सीमकार्ड वापरणारे अवघे १५००० मोबाईल ग्राहक असून ९०० लॅंडलाईन ब्राॅडब्रॅंडपुरतेच शिल्लक राहिले आहेत. बीएसएनएलचे ग्राहक नावापुरतेच ग्राहक उरले आहेत. त्यामुळे या कंपनीला आता घरघर लागल्याचे चित्र आहे.
सन २००२ मध्ये बीएसएनएल मोबाईल कंपन्यांची सेवा सुरू झाल्यानंतर या कंपनीचे सीमकार्ड घेण्यासाठी ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडत होत्या. सीमकार्डसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असे. महिनोन्महिने प्रतीक्षा करूनही सीम मिळत नव्हते. वैजापूर शहरात बीएसएनएलची ऑक्टोबर २००२ मध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. सुरवातीला ३५० रुपयांपासून ते ५०० रुपयांमध्ये चढ्या दराने सीमकार्ड विक्री केल्या गेले. येथील दूरसंचार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी शहरातील बड्या धेंडांशी ( दुकानदार ) हातमिळवणी करून ग्राहकांना लुटण्याचे काम केले. सुरवातीला काळात दूरसंचार कार्यालयात सीमकार्ड उपलब्ध असूनही केवळ जास्त 'मलिदा' मिळण्याच्या लालसेपोटी कर्मचाऱ्यांना शहरातील काही पंटर दुकानदार हाताशी धरून वरकमाईचा गोरखधंदा सुरू केला होता. लुटणारे कोण होते? हे शहरवासियांना ठाऊक आहेच. परंतु परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. हा नियम येथेही लागू झाल्याची प्रचीती कालांतराने सर्वांनाच आली.
एक काळ असा होता की, बीएसएनएलचे सीमकार्ड घेण्यासाठी जास्त पैसे मोजूनही ते मिळत नव्हते आणि आज कमी पैसे होऊनही ते कुणी वापरायला अथवा घ्यायला तयार नाही. आजही बीएसएनएलचे रिचार्ज सर्वात पडतल आणि स्वस्त आहे. मग ग्राहकांना याकडे पाठ का फिरविली? कंपनीची अशी अवस्था का झाली? हे कशामुळे झाले? याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. सुरवातीला शिखरावर असलेल्या कंपनीचा असा अचानक ऱ्हास का होतो? याच्या खोलात गेल्यावर बऱ्याचशा गोष्टीं समोर आल्याशिवाय राहत नाही. ग्राहकांना जोपर्यंत पर्याय नव्हता तोपर्यंत तोंड दाबून बुक्यांचा मार सहन केला. कालांतराने विविध कंपन्यांनी बाजारात उतरून नेटवर्क काबीज केले. अन्य कंपन्यांची आगेकूच सुरू असताना बीएसएनएलने त्यांच्याशी स्पर्धा न करता जैसे थे राहिली.
साधारणतः सहा वर्षांपूर्वी जिओ रिलायन्स कंपनीने ग्राहकांना मोफत काॅल सेवा देऊन मोबाईल जगतात मोठी क्रांती केली. त्यामुळे बीएसएनएल व अन्य कंपन्यांच्या तुलनेत ग्राहकांना जिओ जवळची वाटू लागली. कंपनीचे 'कर लो दुनिया मुठ्ठी में' हे घोषवाक्य खरे ठरले अन् बीएसएनएलचे 'कनेक्टिंग इंडिया'चे धोरण डिस्कनेक्ट होत गेले. परिणामी आजच्या स्थितीत तालुक्यात बीएसएनएलचे सीमकार्ड वापरणारे ग्राहक १५ हजारांवर आले आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ५ जी सेवा सुरू असल्याचा दावा केला आहे. परंतु वास्तविक पाहता शहर अथवा तालुक्यात ३ जी सेवाही ग्राहकांना व्यवस्थित मिळत नाही. दूरसंचार विभागाची उदासीनता, तोकड्या सुविधा व अन्य कंपन्यांच्या तुलनेत मागे असलेल्या नेटवर्कमुळे तालुक्यातील बीएसएनएल सेवेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या कंपनीच्या ग्राहकांना आजच घरघर लागल्याची अवस्था असताना भविष्यात काय स्थिती राहील? याचा विचारच न केलेला बरा!
लॅंडलाईन मोजतोय शेवटची घटका
तालुक्यात सद्यस्थितीत एकूण ९०० लॅंडलाईन फोन आहेत. परंतु याचा वापर काॅल करण्यासाठी कुणीही करीत नाही. लॅंडलाईनचा वापर सध्या केवळ ब्राॅडब्रॅंडपुरताच सुरू आहे. सरकारी कार्यालयासह बॅंका आदींसह खासगी आस्थापनांमध्ये याचा वापर सुरू आहे. एकेकाळी मुशाफिरी असणाऱ्या लॅंडलाईनही आता शेवटच्या घटका मोजत आहे.
कर्मचाऱ्यांचाही वाणवा
शहरातील दूरसंचार कार्यालयात एका उप अभियंत्यासह अन्य दोन अधिकारी व तालुक्यातील खंडाळा, लोणी खुर्द, परसोडा, शिऊर व दहेगाव येथील केंद्रावर कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्यामुळे या विभागाकडे मनुष्यबळाचाही वाणवा आहे.
वैजापूर तालुक्यात बीएसएनएलचे सीमकार्ड वापरणारे एकूण १५ हजार ग्राहक असून ९०० लॅंडलाईन फोन वापरणारे ग्राहक आहेत. याशिवाय कार्यालयात तीन अधिकारी व ग्रामीण भागातील केंद्रावर कंत्राटी कर्मचारी आहेत.
- लाऊडी भास्कर, दूरसंचार विभाग, वैजापूर