ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील नांदगाव शिवारात घडली.
मृत अमन शेख |
अमन हनिफोद्दीन शेख (२२ रा. खान गल्ली) असे घटनेतील मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमन हनिफोद्दीन शेख हा खान गल्ली परिसरात रहिवासास होता. तो खासगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत होता. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तो दुचाकीने येवल्याच्या दिशेने जात होता.
दरम्यान नांदगाव शिवारात भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अमन याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार संतोष सोमवणे करीत आहेत.
कोरोना काळातही तो धावला
दरम्यान अमन हा रुग्णवाहिकेवर चालक असल्यामुळे त्याने रस्ते अपघातात जखमी झालेल्या अनेकांचे जीव वाचविले आहे. याशिवाय कोरोना काळातही त्याने जिवाचा आटापिटा करून रुग्ण घाटी रुग्णालयात पोहोचविले होते. त्याचाच अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.