गोदावरी पुलाचे भूमिपूजन
मागील दहा वर्षात भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानावर आली आहे. गरीब, शेतकरी, कष्टकरी जनता मुख्य प्रवाहात समाविष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत या देशाची सुत्रे पुन्हा नरेंद्र मोदी यांंच्या हाती दिल्यास देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. त्यामुळे मजबूत लोकांच्या हाती सत्ता द्या. लोकसभेचे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार डॉ. भागवत कराड यांना निवडून द्या. असे सांगत केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले वैजापूर व पश्चिम महाराष्ट्रातील पुणतांबा या गावांना जोडणाऱ्या तालुक्यातील पुरणगाव येथील केंद्रीय निधी अंतर्गत १४.९६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचे भूमिपूजन दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याहस्ते झाले.
शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब ठोंबरे, सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हापाध्यक्ष कल्याण दांगोडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, भाजपचे कैलास पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, सुधाकर ठोंबरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
दानवे यांनी आपल्या नेहमीच्याच विनोदी शैलीत चौफेर फटकेबाजी केली. सन २०१४ च्या अगोदर देशाची आणि जनतेची काय स्थिती होती? याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. आम्ही सत्तेवर आहोत. त्यामुळे हिशेब द्यायची आमची तयारी आहे. जनतेने आम्हाला विचारलेल्या प्रश्नांसाठी बांधिल आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील रेल्वेच्या प्रश्नांसह जनतेच्या जीवनावश्यक वस्तू, एअरपोर्ट, रस्ते, शेतकऱ्यांना पीकविमा, सिलिंडर आदी कमी दरात उपलब्ध करून दिले. कोरोना काळात मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी अन्नधान्यासह मोफत औषधी उपलब्ध करून देण्यात आली. एवढेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांची तब्बल ११ तास बैठक घेऊन सन २०४७ मध्ये देश कसा असेल अथवा कसा असावा. याबाबतची ब्ल्यू प्रिंट तयार करून दाखवली. त्यामुळे असे दूरदृष्टी असलेले नेतृत्व मिळाले आहे.
२०२४ मध्येही त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप सरकारची स्थापना होणार असल्याचा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. याशिवाय वैजापूर - पुरणगाव यासह अन्य रस्ते राज्य महामार्गात वर्ग करून ही कामे लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे आश्वासनही त्यांनी दिले. भागवत कराड यांनीही मोदी सरकारच्या कार्यकाळातील योजना व खर्च केलेल्या निधीबाबत माहिती दिली. सूत्रसंचलन अमृत शिंदे यांनी केले. कार्यक्रमास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यास फायदा
दरम्यान वैजापूर व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलाचे काम झाल्यास वैजापूर तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राहता, संगमनेर, शिर्डी येथे जाणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. १८ महिन्यात या पुलाचे काम करण्यासाठी कालावधी ठरवून देण्यात आला आहे.
माझ्यात करंट नाही
दानवे भाषण करण्यासाठी उभे राहताच ध्वनीक्षेपकात बिघाड झाल्यामुळे संबंधित मंडप मालकाने करंटची अडचण झाल्याचे सांगितल्यावर हजरजबाबी दानवेंनी 'माझ्यात करंट नाही' असे सांगून मंडप मालकाची विकेट घेतली. त्यांच्या या कोटीवर मात्र मंडपमध्ये एकच हशा पिकला.