Loksabha Elections | खबरदार.! आचारसंहितेचा भंग कराल तर.. दारुसह 'लक्ष्मी'वरही असणार नजर

0

तहसीलदारांकडून जागेची पाहणी



 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुका प्रशासनाने जवळपास संपूर्ण  तयारी पूर्ण केली असून निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रातील अनियमितता दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  तसेच निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे. यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत.  निवड झालेल्या पथकातील अधिकाऱ्यांना ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रवार विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्याच्या सीमेवर स्थापन करावयाच्या स्थिर सर्वेक्षण (चेक पोस्ट) जागेची तहसीलदारांनी पाहणी केली.






दारुसह 'लक्ष्मी'वरही असणार नजर


आचारसंहीतेदरम्यान निवडणूक विभागाच्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास पथक तात्काळ कारवाई करणार आहे. पथकात  नेमलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे. अधिसूचना जारी होताच सर्व पथके आपापल्या भागात सक्रिय होतील. त्यांनी तयार केलेल्या फ्लाईंग पथक टीमचे सदस्य त्यांच्या परिसरात सतत दौरे करून परिसरातील पैसे, दारू आणि संशयास्पद वस्तू जप्त करून अहवाल देणार आहेत. निवडणुकीदरम्यान उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर व्हिडिओ मॉनिटरिंग टीमचे सदस्य बारकाईने लक्ष ठेवतील.



नांदगाव, सुराळा येथे चेकपोस्ट 



 तसेच वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा सीमेवर स्थापन करावयाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठिकाणाची सुराळा व नांदगाव येथे शनिवारी तहसीलदार सुनील सावंत, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, मंडळ अधिकारी ससाणे, तलाठी फिरोज शेख यांनी पाहणी केली. सहायक खर्च निरीक्षक टीमचे सदस्य व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमला सहकार्य करतील व निवडणुकीवर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवतील.  लेखा संघाचे सदस्य सर्व संघांचे अहवाल आणि उमेदवारांच्या खर्चाची नोंद त्यांच्या खात्यात ठेवतील. व्हिडीओ सर्व्हिलन्स टीमही परिसरात सक्रिय राहून प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे. ठरवून दिलेल्या चेकपोस्टवर स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करतील.  तपासणीच्या वेळी व्हिडिओग्राफीही करण्यात येणार आहे.



निवडणुका  शांततेत पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सहा पथके तयार करण्यात आली आहेत. अधिसूचना जारी होताच पथकाला सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाचे प्राधान्य असणार आहे.


- सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top