साकेगाव - मनूर रस्त्यावरील थरार
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या पाच जणांच्या टोळीचे वाहन पोलिसांनी पकडले खरे. परंतु अंधाराचा फायदा घेऊन या टोळीने पोलिसांना गुंगारा दिल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाही. परंतु असे असले तरी पोलिसांनी त्यांच्याकडील पाच चाकू, एक लोखंडी कोयता, स्क्रूड्रायव्हर, लोखंडी कानस आदी साहित्य व एक लाख वीस हजार रुपये किंमतीची व्हॅगनार गाडी हस्तगत केली आहे.
दरोडेखोरांच्या टोळीचे वाहन खड्ड्यात गेल्याने त्यांना वाहन तेथेच सोडून धूम ठोकावी लागली. |
दरम्यान ही टोळी दरोड्याच्या तयारीत असताना काही सजग नागरिकांनी त्यांचा हा डाव उधळून लावला. नागरिकांच्या पाठलागामुळे ते पळून जात असताना त्यांची गाडी खड्ड्यात गेली अन् त्यांना वाहन सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. यातील दोघांची ओळख पटविण्यास पोलिसांना कागदपत्रांच्या आधारे यश आले आहे. वैजापूर तालुक्यातील साकेगाव - मनूर रस्त्यावर ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हा थरार घडला.
अरबाज इस्माईल तांबोळी, रा. कल्याण व तबराक हुसेन तवकलाल हुसेन रा. कुर्ला मुंबई अशी टोळीतील दोघांची नावे असून अन्य दरोडेखोरांची नावे समजू शकली नाहीत. वैजापूर तालुक्यातील साकेगाव - मनुर रस्त्यावर एक गाडी संशयितरित्या फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी या गाडीला हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता या टोळीने अंधाराचा फायदा घेऊन धूम ठोकली. नागरिकांनी पाठलाग केल्यामुळेच वाहन खड्ड्यात गेले.त्याचवेळी गस्तीवर असलेल्या शिऊर पोलिसांना याबाबत माहिती देऊन कळविले.
दरोडेखोरांच्या वाहनात सापडेले चाकू, कोणता व अन्य साहित्य |
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गाडीमध्ये चाकू, लोखंडी कोयता, कानस, स्क्रु ड्रायव्हर हे दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य आढळून आले. दरोडेखोर पळून गेले असले तरी गाडीत सापडलेल्या त्यांच्या आधार कार्ड व वाहन चालक परवान्यावरुन त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हवालदार राहुल थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरोडेखोरांच्या टोळीविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात दरोड्याच्या प्रयत्नात असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन खड्ड्यात गेले अन् ठोकली धूम
दरम्यान दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असताना सतर्क नागरिकांनी बघितल्यानंतर त्यांनी गाडीला हात दिला. परंतु गाडी थांबविल्यानंतर आपण पकडल्या जाऊ. या भीतीने त्यांनी वाहन जोरात घेतले अन् पळून जाण्याच्या नादात वाहन थेट खड्ड्यात गेले. त्यामुळे वाहन सोडून ते तसेच फरार झाले. असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.