वैजापूर - गंगापूर : ४०० क्युसेकने विसर्ग
रब्बी हंगाम व पिण्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याव्दारे ( Nandur Madhmeshwar Express Canal) ८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर ( Vaijapur ) व गंगापूर ( Gangapur) तालुक्यांसाठी आवर्तन ( Rotation ) सोडण्यात आले आहे. ४०० क्युसेकने विसर्ग कालव्यात सोडून हा विसर्ग सायंकाळी ८०० क्युसेकने करण्यात आला. साधारणतः २० दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून या कालावधीत १.७ टीएमसी (TMC ) म्हणजेच १७०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. पायथा ते माथा या नियमानुसार पाणी अगोदर गंगापूर तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत वैजापूरसह गंगापूर तालुक्यांसाठी रब्बी हंगाम व पिण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे सोडण्यात येणाऱ्या या आवर्तनाचा फायदा रब्बी हंगामाच्या सिंचनासह पिण्यासाठी होणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी आवर्तन नांदूर मधमेश्वर कालव्यात सोडण्यात आले.
साधारणतः २० दिवस म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून या कालावधीत १७०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. पायथा ते माथा या नियमानुसार पाणी अगोदर गंगापूर तालुक्यासाठी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पाणी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय कोपरगाव तालुक्यासाठी गोदावरी डाव्या कालव्याव्दारे पाणी सोडण्यात आले आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे दोन्ही तालुक्यांसाठी आवर्तन सोडल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
वैजापूर - गंगापूर तालुक्यांसाठी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी नांदूर मधमेश्वर कालव्यात ४०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. सायंकाळी हा विसर्ग वाढवून ८०० क्युसेकने करण्यात येईल. साधारणतः २० दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे.
- राकेश गुजरे, कार्यकारी अभियंता, नांमका, वैजापूर