Water Shortage | ऐन हिवाळ्यातच 'पाणीबाणी', 'या' गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा

0

टँकर सुरू करण्यास हात आखडता 



   फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सार्वजनिक विहिरींसह जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी ऐन हिवाळ्यातच 'पाणीबाणी'  ( Water Shortage ) निर्माण झाली आहे. परंतु टँकरबाबत प्रशासनाने काटकसरीचे धोरण अवलंबल्याने सध्या १२ गावांना १२ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी २४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान टँकर सुरू करण्याबाबत प्रशासनाने हात आखडता घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 









डिसेंबर महिन्यापासून पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात झाली.मात्र टँकर सुरु करण्याबाबत यावेळी प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टँकरने पाणी पुरवठा होत असतांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी झाल्याने आवश्यक असेल तरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करा. असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील टुणकी दसकुली, भगूर, वाकला,पेंडेफळ, अंचलगाव, शहजतपूर, लोणी बुद्रुक, सावखेड खंडाळा, शिवराई आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.




 तालुक्यातील अगरसायगाव, माळीसागज, कनकसगज, लोणी खुर्द, बाभुळतेल या पाच गावांचे प्रस्ताव पडून आहे. दरम्यान, टँकरची मागणी करणारे नवीन प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करणे सुरु आहेत. त्यापैकी काही प्रस्ताव भूवैज्ञानिक व उपअभियंत्यांकडे स्थळ पाहणीसाठी देण्यात आले आहेत.  दरम्यान वैजापूर तालुक्यात मागील काही वर्षांच्या टंचाईचा अनुभव लक्षात घेता खाजगी विहीर, बोअरवेल  मालकांमध्ये उदासिनता आहे. टंचाईच्या काळात ग्रामस्थांना पाणीपुरवठा केल्यानंतरही मोबदला मिळत नाही. 




मोबदल्यासाठी विहीर अधिग्रहणधारकांना प्रशासन दफ्तरी वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीही त्यांना मोबदला अदा करण्यासाठी विलंब लागल्याचे यापूर्वीचे अनुभव आहेत. त्यामुळे विहीर, बोअर मालकांमध्ये अधिग्रहणासंदर्भात उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी विहीर मालकांनी शासकीय विहिर अधिग्रहणांचे प्रस्ताव धूडकावून खासगी टँकरचालकांना पाणी विक्री करून रोख पैसे कमविण्याचा धंदा सुरु केल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.



आपबीती सांगायची कुणाला ? 



तालुक्यात पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू झालेली असतानाच येथील पंचायत समितीचा कारभार ढेपाळल्यासारखी परिस्थिती आहे. गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाही. कुणाचाच कुणावर पायपोस राहिला नाही. 'भर अब्दुल्ला गुड थैली में' अशी बेबंदशाही कार्यालयात सुरू आहे. गटविकास अधिकारी कुणाला मोजायला तयार नाही. दस्तूरखुद्द आमदारांनी खडसावून व नागरिकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालूनही परिणाम मात्र शून्य आहे. त्यामुळे टंचाईकाळात ग्रामस्थांनी आपबीती कुणाला सांगायची. हाच खरा प्रश्न आहे. 






सध्या १२ गावांमध्ये १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाई असलेल्या गावात अन्य उपाययोजना कराव्यात. असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरु असलेल्या गावात टँकरचे प्रस्ताव नाकारण्यात आले असून त्यांना उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


- किरण पोपळघट, पाणीपुरवठा विभाग, वैजापूर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top