Water Shortage | जलसंकट: शहरवासियांनो सावधान .! दीड महिन्यापुरताच जलसाठा

0

वैजापूरकरांना पाणीटंचाई भेडसावणार 



वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील घोयगाव साठवण तलावात फक्त दीड महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वैजापूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारीपासून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 







गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसाठा झाला नाही. एरवी या प्रकल्पातूनच शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु नारंगी प्रकल्पातील जलसाठा नसल्यासारखा आहे. नारंगीतील जलसाठा संपुष्टात आल्यानंतर वैजापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यावरच अवलंबून राहवे लागते. वैजापूर शहराला नशिक पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा केला जातो. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचा वैजापूर नगरपलिकेशी करार झालेला आहे. या करारनुसार पिण्यासाठी दर महिन्याला कोपरगाव साठवण तलावात आवर्तन सोडले जाते. 



उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने घोयगाव  येथील चार साठवण तलावात १५ एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरवासियांची तहान भागविण्यासाठी नगरपलिकेने साठवण तलावातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले आहे. नगरपालिकेच्या घोयगाव येथील १५ कोटी लिटर क्षमता असलेल्या चारही साठवण तलावात सध्यस्थितीत १५ एप्रिलपर्यंत शहरवासियांना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. 



६० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन स्त्रोत आहेत. त्यापैकी नारंगी मध्यम प्रकल्प हा स्त्रोत नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या वर्षात पावसाच्या अवकृपेमुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा समूहातून गोदावरी डावा तट कालव्याव्दारे शहरासाठी ६० दिवसाला सोडण्यात येणाऱ्या १६८.६२ मिली लिटर पाणी साठ्यावर शहरातील पाणीपुरवठयाची भिस्त आहे.



पाईपलाईनने आणले जाते पाणी 



 कोपरगाव तालुक्यातील घोयगाव येथे नगरपलिकेचे १५ कोटी लिटर क्षमतेचे चार साठवण तलाव आहेत. त्या साठवण तलावात पाईपलाईनद्वारे पाणी आणले जाते. ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नळाद्वारे शहरवासियांना पुरविले जाते. 



तीन दिवसाआड पाणीपुरवठा 



नगरपालिकेच्या घोयगाव येथील साठवण तलावात अत्यल्प साठा असल्यामुळे २७ फेब्रुवारीपासून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी पालिकेकडून  दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. 



शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोयगाव साठवण तलावात सध्या १५ एप्रिलपर्यंत शहरवासियांना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. नाशिक पाटबंधारे विभागाकडून १५ एप्रिलपनंतरच आवर्तन सोडण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे नारंगी मध्यम प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला नाही. परिणामी प्रकल्पात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासियांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. 


- भागवत बिघोत, मुख्याधिकारी, वैजापूर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top