२० दिवस आवर्तन राहणार सुरू
रब्बी हंगाम व पिण्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याव्दारे ८ फेब्रुवारी रोजी वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. याशिवाय कोपरगाव तालुक्यासाठी गोदावरी डाव्या कालव्याव्दारे पाणी सोडणार आहे. साधारणतः २० दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून या कालावधीत १.७ टीएमसी म्हणजेच १७०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. पायथा ते माथा या नियमानुसार पाणी अगोदर गंगापूर तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत वैजापूरसह गंगापूर तालुक्यांसाठी रब्बी हंगाम व पिण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे सोडण्यात येणाऱ्या या आवर्तनाचा फायदा रब्बी हंगामाच्या सिंचनासह पिण्यासाठी होणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून ८ फेब्रुवारी रोजी आवर्तन कालव्यात सोडण्यात येणार आहे. साधारणतः २० दिवस म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून या कालावधीत १७०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे.
पायथा ते माथा या नियमानुसार पाणी अगोदर गंगापूर तालुक्यासाठी सोडण्यात येणार आहे. याशिवाय कोपरगाव तालुक्यासाठी गोदावरी डाव्या कालव्याव्दारे पाणी सोडण्यात येणार आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाण्याचा लाभ वैजापूर तालुक्यातील ४९ गावे व गंगापूर तालुक्यातील ४६ गावे व कोपरगाव तालुक्यातील गावांना होतो. या पाण्यामुळे तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना सिंचनाचा फायदा होणार आहे. पाणी प्रथम गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून त्यानंतर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दरम्यान यंदा कमी झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईची दाहकता जाणवायला सुरवात झाली आहे. याशिवाय दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे विहिरींच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे दोन्ही तालुक्यांसाठी आवर्तन सोडणे गरजेचे होते. आवर्तन सोडल्याने दोन्हीही तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. आवर्तन सोडण्यात येणार असल्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ८ फेब्रुवारी रोजी नांदूर मधमेश्वर कालव्यातून दोन्हीही तालुक्यांसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. साधारणतः २० दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून या कालावधीत १७०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. पायथा ते माथा या नियमानुसार पाणी वाटप करण्यात येईल.
- राकेश गुजरे, कार्यकारी अभियंता, नांमका, वैजापूर