'ठिकाणावर' नसल्याचा परिपाक
वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालय नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत असते. मग ते कर्मचाऱ्यांची खाबूगिरी असो किंवा दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचारी असो. अशाच एका नव्या कारणाने पंचायत समिती कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कार्यालयात सतत चकरा मारून देखील अधिकारी भेटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांच्याच ( BDO ) खुर्चीला हार घातला.
येथील पंचायत समिती कार्यालय नेहमीच वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या उपदव्यापामुळे चर्चेत राहते. मग ते लाचखोर, दांडीबहाद्दर, रेल्वेच्या वेळापत्रकावर जिल्ह्याहून ये-जा करणारे अधिकारी व कर्मचारी असो अथवा अस्वच्छ परिसर असो. या सर्व बाबी बिनबोभाटपणे सुरू आहे. शुक्रवारी तालुक्यातील चोरवाघलगाव येथील काही ग्रामस्थ कामानिमित्त गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले. परंतु नेहमीप्रमाणे त्यांची भेट न झाल्याने संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्याच खुर्चीला हार घातला. दरम्यान गटविकास अधिकारी दालनात नसताना कार्यालयात प्रभारी अधिकारी कोण ? याबाबत आम्हाला कुणीही माहिती देत नाही. याशिवाय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दलही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वैजापूर पंचायत समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळातही कार्यालयाचा कारभार ढेपाळला होता. आता नूतन गटविकास अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरही परिस्थिती 'जैसे थे' आहे. ते कार्यालयात तर गैरहजर असतातच. परंतु फोन काॅलही रिसीव्ह करीत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कार्यालय परिसराचे अक्षरशः 'जंगल' झालेले असताना याकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ नाही. पंचायत समिती कार्यालयाचा कारभार 'आओ जाओ घर तुम्हारा' असा झाला असून पूर्णपणे ढेपाळला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी देव घुनावत यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्या एका प्रलंबित प्रश्नासाठी मागील महिन्यात कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु तुमचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर आता तरी काम मार्गी लागेल. या आशेने त्यांनी कार्यालयात खेट्या मारण्यास सुरवात केली. परंतु काही केल्या गटविकास अधिकाऱ्यांशी त्यांची भेट होत नव्हती तर संबंधित विभागाचे कर्मचारी त्यांना उडवाउडवीचे उत्तरं देऊन पिटाळवून लावत होते. त्यामुळे मेटाकुटीला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांच्याच खुर्चीला हार घातला.