गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई
दोन महिन्यांपूर्वी तब्बल साडेचार लाख रुपयांचे स्टील चोरी करणाऱ्या दोन भामट्यांना छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एका वाहनासह स्टील असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालेब उर्फ खाजा रमजान शेख ( रा. पिराचे बाभूळगाव ह.मु. लष्कर कन्नड ) व अलीम अस्लम शहा रा. इंदिरानगर, कन्नड असे या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून पथकाने एका वाहनासह ४ लाख रुपये किंमतीचे स्टीलदेखील जप्त केले आहे. दरम्यान घटनेतील तीन चोरटे अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र संचेती रा.मारवाडी गल्ली, वैजापूर यांनी तालुक्यातील धोंदलगाव - बाभूळगाव रस्त्यावरील पुलाचे कंत्राट घेतले होते. कामासाठी लागणारे सिमेंट व स्टील हे मनसुख झांबड यांच्या शेतवस्तीलगत उघड्यावर आणून टाकले होते . २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कामावरील स्टील चोरी गेल्याचे संचेती यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे खाखेचे पोलिस गुन्ह्याचा तपास करत असताना कन्नड येथील तालेब उर्फ खाजा रमजान शेख व अलीम अस्लम शहा या यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी ही चोरी केली असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानुसार पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास केला असता पोलिसांना चोरटे निष्पन्न झाले. तालेब व अलीम या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. 'चोरीच्या या घटनेत आमच्याशिवाय इतर तिघांचा समावेश आहे' अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली. पथकाने या दोघांसह चार लाख ५ हजार रुपये किंमतीचे स्टील व वाहन (क्रमांक एमएच २० जीसी १९६०) जप्त केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस उपधीक्षक महक स्वामी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भगतसिंग दुलत, हवालदार नामदेव शिरसाठ, दीपेश नागझरे, वाल्मिक निकम, संजय घुगे, अशोक वाघ, संजय तांदळे यांनी केली.