बीडीओंना नाकर्तेपणा भोवला
वैजापूर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुनावत यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही बदली करण्यात आल्याचा उल्लेख ग्रामविकास विभागाने आदेशात नमूद केला आहे. परंतु असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या नाकर्तेपणामुळे वादग्रस्त ठरले होते. आमदारांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचा रोष व नागरिकांच्या असंख्य तक्रारी हेच त्यांच्या बदलीचे कारण असल्याचीही चर्चा आहे.
सुरवातीपासूनच ठरले वादग्रस्त
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुनावत हे साधारणतः तीन महिन्यांपूर्वी वैजापूर येथे रुजू झाले होते. परंतु सुरवातीपासूनच ते वादग्रस्त ठरायला लागले. वैयक्तिक कामांसाठी आलेल्या अभ्यगंतांना गटविकास अधिकाऱ्यांचे 'मुखदर्शनच' होत नसल्याने ते वैतागून गेले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही संपर्क होत नव्हता. परिणामी नागरिकांनी आमदार रमेश बोरनारे यांच्यासह अन्य विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे तक्रारी केल्या. कार्यालयाला दांडी मारणे, काॅल न घेणे व नागरिकांना प्रतिसाद न दिल्याने ते सर्वांच्याच रोषाचे धनी ठरले.
गलथान व बेशिस्त कारभाराचा पंचनामा
वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथील नागरिकांनी तर एकदिवस चक्क त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घातला होता. त्यानंतर दोन दिवसांनी योगायोगाने मग्रारोहयोची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार रमेश बोरनारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या गलथान व बेशिस्त कारभाराचा पंचनामा करून त्यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. सरकारी कामात हलगर्जीपणा किती असावा. हे त्या बैठकीतून सिध्द झाले होते. बोरनारे यांच्यासह व्यासपीठ व उपस्थित नागरिकांनी गटविकास अधिकारी देव घुनावत यांच्या 'कर्तृत्वाचा' पाढा वाचून चांगलेच फैलावर घेतले.
'तुम्ही अकार्यक्षम आहात, चालते व्हा'
कार्यालयप्रमुख म्हणून भान विसरलेल्या या अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधी व नागरिकांनी जाणीव करून द्यावी म्हणजे ही शोकांतिका म्हणावी लागेल. त्यांच्यावर थेट हल्लाबोल करून चांगलेच फटकारले. एवढेच नव्हे तर 'बीडीओ, तुम्ही अकार्यक्षम आहात, चालते व्हा' इथपर्यंत त्यांना सुनाविण्यात आले. याशिवाय कार्यालयात थांबत नाही, सरपंच व नागरिकांना भेटत नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे. असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान बदलीचे कारण काहीही असले तरीही हेही कारणे तितकेच सत्य आहे. घुनावत यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.