सव्वालाखाचा ऐवज लंपास
बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सव्वालाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर शहरातील संभाजीनगर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश मधुकर जोशी हे कुटुंबियांसह वैजापूर शहरातील संभाजीनगर परिसरात रहिवासास आहेत. दरम्यान दवाखान्याच्या कामानिमित्त ते सहकुटुंब बाहेरगावी गेले होते. नेमके याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून एक लाख २० हजार रुपयांची रोकड व दोन हजारांचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरी चोरी झाल्याचे समजताच सुरेश जोशी यांनी तत्काळ वैजापूर गाठले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.