सीसीटीव्ही: असून खोळंबा नसून अडचण
विजय गायकवाड| सत्यार्थी
वैजापूर शहरातील ( Vaijapur City) येवला रस्त्यालगत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ( State Transport Corporation) नवीन बसस्थानकात ( New Busstand) असलेले सीसीटीव्ही कॅमेरे ( CCTV camera) म्हणजे 'डोळे असून आंधळे' असा काहीसा प्रकार होत आहे. मुळात ज्या महत्त्वाचा फलाटावर कॅमेरे पाहिजे. तेथे कॅमेरे न बसविता भलत्याच ठिकाणी बसविण्यात आल्याने व्हिजन ( Vision ) मिळायला अडचणी येत आहेत. परिणामी बसस्थानकातून अनेकदा प्रवासी महिलांचे दागिने ( Women's Jewellery) चोरी जाण्याच्या घटना घडत असतात. परंतु बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अद्यापपर्यँत कोणत्याही घटनेतील चोरटे ( Thieves ) पोलिसांच्या गळाला लागले नाही. त्यामुळे चोरट्यांचे आणखी फावत आहेत.
शहर व तालुक्यातील वाढत्या प्रवासी संख्येमुळे मागील काही वर्षांपूर्वी शहरातील येवला रोडलगत नवीन बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांची ये - जा करण्यासाठी नेहमीच मोठया प्रमाणावर वर्दळ असते. या वर्दळीचाच फायदा घेत चोरटे बसमध्ये घुसून प्रवासी महिलांच्या अंगावरील, पर्स अथवा पिशवीतील दागिन्यांवर डल्ला मारण्याच्या घटना वारंवार घडतात. मागील काही दिवसांत चोरीच्या या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत. दरम्यान बस बसस्थानकात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु असे असतानाही चोरीच्या घटनांनंतर अनेकवेळा बसेस थेट पोलिस ठाण्यात नेल्या जातात.
चोरट्यांनी 'हाथ की सफाई' केल्यानंतर चोरटे लगेचच पळ काढतात. मग साप गेल्यानंतर काठी बडविण्यासारखे हा प्रकार होऊन अन्य प्रवाशांना ठाण्याततच बसून राहवे लागते. त्यामुळे ते वेठीला धरून त्यांना नाहकचा त्रास सहन करावा लागतो. यातील अनेकांना महत्त्वाच्या कामासाठी अथवा मुलाखत, लग्न व कार्यांसाठी जायचे असते. अशा घटनांमुळे या नियोजित कार्यक्रमांना 'खो' बसतो. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अद्यापपर्यँत कोणत्याही घटनेतील चोरटे पोलिसांच्या गळाला लागलेले नाहीत.
बसमधील प्रवासी महिलांचा ऐवज चोरीच्या घटनेत प्रवाशांची हरकिरी नक्कीच असते. परंतु याशिवाय बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने देखील चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसावे. वैजापूर बसस्थानकात पाच फलाट आहेत. पाचही फलाटावर बस नसताना एकच कॅमेऱ्यात हे सर्व फलटाचे क्लियर व्हिजन दिसते. परंतु कॅमेऱ्याच्या समोर असलेल्या पहिल्या फलाटावर जर बस येऊन थांबली तर अन्य चारही फलाटांचे अपेक्षित व्हिजन येत नाही. यामुळे प्रत्येक फलाटावर येणाऱ्या बसमध्ये बसणारे-घुसणारे-उतरणाऱ्या प्रवासी स्पष्ट दिसू शकत नाही.
त्यामुळे चोरट्यांना चोरीच्या घटनांना 'परिणाम' देणे सोयीचे होऊन जाते. बसस्थानक व परिसरात प्रत्येक महिन्याला सरासरी दोन तर वर्षात जवळपास २४ चोरीच्या घटना घडतात. परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह यंत्रणेच्या 'अकार्यक्षम व्हिजन'मुळे चोरटे पोलिसांच्या गळाला लागत नाही. किमान आता तरी आगार व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरे योग्य ठिकाणी लावले तर चोरटे पोलिसांच्या रडारवर येऊन ते हाती लागू शकतात. परंतु हा जर तरचा विषय आहे.
एकच कॅमेरा करतोय काम
बसस्थानकातील सात सीसीटीव्ही कॅमेरे असून नसल्यासारखे आहेत. प्रवेशद्वारावर ( एंट्रंस ) व पाठिमागील बाजूला काही कॅमेरे नको असताना बसविण्यात आले आहेत. दर्शनी भागातील फक्त एकाच फलाटावर कॅमेरा आहे. हा एक कॅमेरा संपूर्ण परिसर कव्हर करू शकत नाही. वास्तविक पाहता चोरीच्या घटना या बसमध्ये चढताना - उतरताना होतात. याचवेळी चोरटे गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करतात. त्यामुळे सारासार विचार करून कॅमेऱ्यांचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
बसस्थानक परिसरात महामंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. कॅमेर्यांच्या जागा चुकल्या आहेत. हे मला मान्य आहे. कॅमेरे बसविण्यासाठी समिती नियुक्त केलेली असते. मला एकट्याला कॅमेऱ्यांच्या जागा ठरविण्याचा अथवा बदलण्याचा अधिकार नाही. समितीतील विभागीय नियंत्रक व अन्य सदस्यांच्या सहमतीने कॅमेऱ्यांची जागा नक्कीच बदलली जाईल.
- किरण धनवटे, आगारप्रमुख, वैजापूर