South Central Railway | 'हे' रेल्वेस्थानक होणार 'हायटेक', चेहरा - मोहरा बदलणार

0

अत्याधुनिक सोयीसुविधांसह कायापालट 




विजय गायकवाड  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 'अमृत भारत स्टेशन योजनेतर्गंत' देशातील ५५० रेल्वे स्टेशनच्या विविध कामांचे ऑनलाईन भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण झाले. या योजनेतर्गंत वैजापूर शहरानजीकच्या रोटेगाव रेल्वे स्थानकाचीही ( Rotegaon Railway Station) निवड करण्यात आली असून अत्याधुनिक सुविधांसह कायापालट करण्यासाठी ११ कोटी ६६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. परिसरातील विविध कामांसह सुशोभीकरण करण्यात येऊन रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.








अमृत भारत स्टेशन योजनेतर्गंत देशातील विविध स्टेशनच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सोमवारी ऑनलाईन झाले. या योजनेतर्गंत शहरानजीक असलेल्या रोटेगाव रेल्वे स्थानकासाठी ११ कोटी ६६ लाख रुपये विविध सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे स्थानक अद्ययावत ( अपग्रेडेशन) करण्याचा मुख्य उद्देश या मागे आहे. केवळ रेल्वे स्थानकाची सुधारणा करणे एवढाच उद्देश यामागे नसून प्रवासी, ग्राहकांना सुविधा देऊन त्या शिखरावर नेणे हा आहे. 








रोटेगाव स्थानकाच्या प्रदक्षिणा क्षेत्रात सुधारणा करण्यासह ( सर्कल) वाहतूक सुविधांचा मुक्तप्रवाह, प्रतिक्षालयात सुविधा ( वेटिंग हाॅल) व प्रवाशांना अनुकूल संकेताची तरतूद केली जाणार आहे. याशिवाय स्थानक परिसरातील रस्ता दुरूस्ती, विद्युत रोषणाई, इमारत नूतनीकरण, स्वच्छ प्रसाधनगृह, दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था व सोयीसुविधा, फलाटात टाईल्स बसविणे, डोमशेड ( कव्हरसेट) बांधकाम करणे, कोच माहिती फलक व दोन्हीही फलाटावर लिफ्ट ( उदवाहन) बसविणे आदी विविध कामे करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून बकाल अवस्थेत असलेल्या या रेल्वे स्थानकात येत्या काही दिवसांत हायटेक सुविधा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 




काय आहे या योजनेची वैशिष्ट्ये?


@ दूरदृष्टी ठेवून रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकीकरण करणे.


@ वाढत्या गरजा लक्षात घेऊन मास्टर प्लॅननुसार विविध महत्त्वाच्या घटकांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे.


@ दर्शनीभाग सुशोभित करून  सौंदर्यीकरण करणे. पोर्चेस निर्मिती करणे. 


@ रस्त्यांच्या रुंदीकरणासह अवांछित संरचना काढून टाकणे. डिझाईन केलेले चिन्ह, समर्पित पादचारी मार्ग, सुनियोजित वाहनतळ क्षेत्र, सुधारित प्रकाश सुविधा. 


@ प्रवाशांना सुखद अनुभव देण्यासाठी स्थानिक कला व संस्कृतीला प्राधान्य देणे.


@ हायलेवल फलाट व बांधकाम करणे.


@ शाश्वत व पर्यावरणपूरक उपायांकडे वाटचाल करणे.




रोटेगाव रेल्वे स्थानकाची अमृत भारत  स्टेशन योजनेंतर्गत निवड झाली असून स्थानकाच्या मुलभूत सुविधांसह कायापालटासाठी ११ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दूरदृष्टीकोण ठेवून आगामी काळात ही विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे.


- राजेंद्रकुमार मीना, प्रबंधक, अपर मंडल रेल्वे, नांदेड

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top