ट्रकचालक जागीच ठार
धावत्या कंटेनरला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाल्याची २ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील गोळवाडी शिवारात घडली.
ऋषीकेश सोमवंशी रा.लातूर असे अपघातात ठार झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ऋषीकेश सोमवंशी हा मालवाहू ट्रक घेऊन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात होता.
दरम्यान गोळवाडी शिवारात पोहचताच तो चालवत असलेल्या भरधाव ट्रकने एका धावत्या कंटेनरला पाठीमागच्या बाजूने जोराची धडक दिली. या जोरदार धडकेत ट्रकच्या समोरील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला तर चालक ऋषीकेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हवालदार जीवन पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान हा अपघात घडताच महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होऊन सुमारे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.