रस्त्यांची झाली होती चाळणी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी ( Nagpur - Mumbai Samruddhi Mahamarg) लागणाऱ्या गौणखनिजांच्या अवजड वाहतुकीमुळे ( Mineral Transport) वैजापूर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली होती. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर आता मरणपंथाला लागलेल्या रस्त्यांचे पुनरूज्जीवन ( Revival ) होणार आहे. या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी शासनाने तब्बल ११६ रस्त्यांना ३६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रस्ते दळणवळणासाठी गुळगुळीत होणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे शहरासह ग्रामीण भागात चाळणी झालेल्या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनिधीने शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. साडेचार वर्षांच्या कार्यकाळात केंद्र व राज्य शासनाचे नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३६८ कोटी ३५ लाखाचा निधी ११६ रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. या प्राप्त निधीतून आता पर्यत २१ कामे पूर्ण झाली असून असून ६८ कामे प्रगतीपथावर आहेत. बांधकाम विभागाकडून २९ कामाची निविदा प्रक्रिया सुरु असल्याची महिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अजित रोडगे यांनी दिली.
नागमठाण - श्रीरामपूर तालुक्याला जाेडणारा पुलही वाहतुकीसाठी लवकरच खुला हाेणार आहे. भाजप 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्षात लोकार्पण झाले. मात्र हा महामार्ग उभारणीसाठी तालुक्यातील २०० किलोमीटर रस्त्यांचा चिथडा झाला. महामार्ग निर्मितीसाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात गौणखनिज व साहित्यांची वाहनाद्वारे वाहतूक केल्यामुळे विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची चाळणी झाली होती. वैजापूर तालुक्यात जाणाऱ्या ५५ किलोमीटर समृद्धी महामार्गासाठी चांगल्या रस्त्यांची वाट लागली होती. वाहतुकीचे उद्ध्वस्त झालेले जाळे पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी जुळवाजुळव करावी लागली.
दरम्यानच्या काळात रस्ते खराब झाल्यामुळे भाजपसह विविध राजकीय पक्षाच्यावतीने आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्याकडेही निवेदने देऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु विकास अथवा नवनिर्माण करायचे असेल तर काही गोष्टींचा बळी जाऊन असुविधांचा सामना हा करावाच लागतो. तसेच काहीसे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाबाबत झाले. गौणखनिजांच्या अवजड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्ते उद्ध्वस्त झाले खरे. परंतु यातूनच समृद्धीची नवनिर्मिती झाली. हेही तितकेच खरे आहे. समृद्धी निर्मितीसाठी चार - पाच वर्षे गेली. तेव्हापासूनच सामान्य नागरिकांसह वाहनचालकांना या खडतर रस्त्यांवरून प्रवास करावा लागत होता. परंतु आता हा खडतर प्रवास लवकरच संपुष्टात येऊन दळणवळण सुसह्य होणार आहे.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा
आमदार रमेश बोरनारे ( MLA Ramesh Bornare) यांनी सातत्याने पाठपुरावा करून केंद्र व राज्य सरकारकडील विविध योजनेतून ११६ रस्त्यांना ३६८ कोटीचा निधी मंजूर करुन आणला. याशिवाय भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी ( Dr. Dinesh Pardeshi) यांनीही पाठपुरावा केला होता. रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध मंजूर झाल्यामुळे रस्ते मात्र गुळगुळीत होऊन प्रवाशांच्या मरणयातना कमी होणार आहे.