Raid on Medical | वैजापुरात औषधीसाठा जप्त; अडिच लाखांचा माल हस्तगत

0

विनापरवाना सुरू होती विक्री 




वैजापूर शहरातील शिवराई रस्त्यावर विनापरवाना सुरू असलेल्या एका मेडिकल ( औषधालय) स्टोअर्सवर अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पथकाने दोन लाख ३६ हजार ३०० रुपये किमतीचा औषधांचा साठा जप्त केला आहे. दरम्यान या कारवाईमुळे शहरातील मेडिकल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 











  याबाबत अधिक माहिती अशी की , वैजापूर शहरातील शिवराई रस्त्यावर असलेल्या गीताई मेडिकल स्टोअर्समध्ये विनापरवाना औषध विक्री करण्यात येत असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार औषधी निरीक्षक गुप्तवार्ता बळीराम मरेवाड व औषधी निरीक्षक अंजली मिटकरी यांनी गीताई मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकला असता गीताई हाॅस्पिटलचे संचालक डॉ. चैतन्य तांबे यांच्या सांगण्यावरून फार्मासिस्ट गणेश साळुंके याने विनापरवाना जागेवरील गीताई हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा करून तो विक्री करीत होता. पथकाने मेडिकलमधून २ लाख ३६ हजार ३०० रुपये किंमतीचा औषध साठा जप्त केला.औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार विनापरवाना साठवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई आली. आर. एम. बजाज (सहायक आयुक्त परिमंडळ २) व  गिरीश हुकरे ( सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 




प्रशासन इकडे लक्ष देईल का?


दरम्यान शहरातील बहुतांश दवाखान्यात विनापरवाना मेडिकल सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तिकडेही लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बहुतांश मेडिकलमध्ये विना प्रिस्क्रिप्शन औषधी दिली जातात. तसेच पकक्की देयके दिली जात नाही. साध्या कागदावरच मेडिकलचे पैसे लिहून रुग्णांची बोळवण केली जात आहे. सामान्य रुग्ण तक्रार करण्यासाठी धजावत नसल्याने मेडिकल चालकांचे फावत आहे. वास्तविक पाहता मेडिकल ( औषधी) दिल्यानंतर देयके देणे बंधनकारक असतानाही चालकांनी हे नियम धाब्यावर बसविले आहे. परिणामी कोणत्या औषधांचे किती उकळायचे? हे मात्र चालकांच्या हातात आहे. सामान्य नागरिकांना मेडिकल नियमांबाबत फारशी माहिती नसल्याने ते चालक जेवढे पैसे गुमान देऊन निघून जातात. त्यामुळे मेडिकल चालकांसाठी प्रिस्क्रिप्शन व पक्के देयके देणे बंधनकारक केले पाहिजे. अशी मागणी होत आहे. 




वैजापूर शहरातील शिवराई रस्त्यावरील गीताई मेडिकल स्टोअर्समध्ये विनापरवाना औषधी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन छापा टाकला असता मेडिकलमध्ये दोन लाख ३६ हजार ३०० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. 


- आर. एम. बजाज, सहायक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top