'तसे घडलेच नाही', पोस्ट व्हायरल
विजय गायकवाड | सत्यार्थी
माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या सभेतील 'टक्केवारी'च्या विषयाने समाज माध्यमांवर चांगलीच उचल खाल्ली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी ( Chandrakant Khaire ) टक्केवारीचा विषय भाषणातून छेडून पक्षाच्याच एका माजी जिल्हा परिषद सदस्याला ( Z P Members ) साक्षीदार करायचा प्रयत्न केला खरा. परंतु सभेच्या रात्रीच 'त्या' ठाकरसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्याने 'तसे काही झालेच नाही' अशी पोस्ट सोशल मीडियावर ( Social media) व्हायरल ( Viral ) करून या 'लचांडातून' नामानिराळे होण्याचा प्रयत्न केल्याने खैरे चांगलेच 'तोंडघशी' पडले आहेत.
त्याचे झाले असे की, १२ फेब्रुवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद Jansamvad ) दौऱ्याच्या निमित्ताने वैजापूर ( Vaijapur ) शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर ( Panchayat Samiti Office) सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ठाकरेंसह सर्वच वक्त्यांनी शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे ( MLA Ramesh Bornare) यांच्यावर तोंडसुख घेतले.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट आमदार कार्यकर्त्यांकडून टक्केवारी घेत असल्याचा आरोप भाषणातून केला. याचवेळी खैरेंनी थोडा 'पाॅज' घेऊन व्यासपीठावरच असलेल्या मनाजी मिसाळ यांच्याकडे कटाक्ष टाकून काय मानाजी, बरोबर आहे ना? असा प्रश्न विचारला खरा. त्यावर मिसाळ यांनी काहीच उत्तर दिले नाही. परंतु खरी गंमत सभा संपल्यानंतर सुरू झाली. सभा झाली. खैरे निघून गेले. 'आमदार बोरनारे यांनी मला कधीही एक रुपयाही मागितला नाही. असं मी कधी कुणाला बोललोही नाही. माझं नाव घेऊन कुणी चुकीचे बोलत असेल तर माझा संबंध नाही' अशी पोस्ट मिसाळ यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर या वादाला तोंड फुटले अन् चर्चा सुरू झाली.
विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. खैरेंनी मिसाळ यांना साक्षीदार ठेवून आमदार रमेश बोरनारे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु अवघ्या काही तासांतच मिसाळ यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने खैरेच तोंडघशी पडले. मिसाळ यांनी ही पोस्ट टाकून खैरेंना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे लिहिले की, माझे नाव घेऊन कुणी चुकीचे बोलत असेल तर माझा संबंध नाही. याचाच अर्थ खैरेंनी मिसाळ यांना उगाचच साक्षीदार करण्याचा प्रयत्न केला. असाही होतो. खैरेंनी आरोप करून उपस्थितांकडून टाळ्या मिळवून तात्पुरती वाहवा मिळवली खरी. परंतु त्यांचा तो आनंद फार टिकला नाही. स्वपक्षातीलच पदाधिकाऱ्याने हा आरोप फेटाळून लावल्याने त्यातील हवा निघून गेली.
उत्कृष्ट राजकारणाची प्रचीती
भलेही आमदार रमेश बोरनारे व मनाजी मिसाळ वेगवेगळ्या पक्षात काम करतात. परंतु स्वपक्षातीलच वरिष्ठ नेत्याने आरोप करूनही त्यांच्या होकाराला हो न मिळवता हा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून फेटाळून लावत मिसाळ यांनी उत्कृष्ट राजकारणाची प्रचीती आणून दिली. राजकारणात विरोधक असतात. भविष्यातही असतील. परंतु केवळ विरोधक आहे म्हणून खालच्या पातळीवर जाऊन आरोप करायचे का? हाही विषय तितकाच महत्त्वाचा आहे. राजकारणात धुतल्या तांदळासारखे कुणीच नसतात. व्यासपीठावर बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि प्रत्यक्ष कृती करणे. ही वेगळी बाब आहे. दरम्यान खैरेंच्या टक्केवारीच्या आरोपाचे स्वपक्षातीलच पदाधिकाऱ्याने खंडन करून घरचा आहेर दिल्याची चर्चा वैजापूर तालुक्यात रंगली आहे.