बॅंकेकडून फुटेजची तपासणी
विजय गायकवाड
वैजापूर तालुक्यातील वीरगाव - मुर्शदपूर ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत तब्बल ६४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. बॅंकेसह प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून लाखोंचा मलिदा लाटला. याप्रकरणी आता प्रशासनासह पोलिस यंत्रणा व बॅंक अधिकारी 'ॲक्शन मोड'वर आले आहेत. एकीकडे गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांना कारवाईचे आदेश दिले आहे तर दुसरीकडे पोलिसांचीही प्रक्रिया सुरू झाली असून बॅंक अधिकारी सीसीटीव्ही केॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करीत आहेत. त्यामुळे प्रकरणाचा लवकरच छडा लागण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावरून ०१ नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण ६३ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचे सरपंच मनीषा थोरात यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र ग्रामीण बॅक व्यवस्थापकांकडे तक्रार देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्यामुळे बॅंकेसह प्रशासन हादरून गेले आहे. विशेष म्हणजे २४ जानेवारी रोजी याबाबत तक्रार देऊनही प्रशासन कासवगतीने कारवाई करीत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीच्या अर्थिक व्यवहाराची जबाबदारी ही सरपंच व ग्रामसेवकाची असते. त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करून आमच्या कार्यालयास अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी देव घुनावत यांनी लेखी पत्राद्वारे सरपंच व ग्रामसेविकेस दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक शिवशंकर लाईटवार यांची भेट घेऊन विचारपूस केली असता, सरपंच व ग्रामसेवकांनी सादर केलेल्या ठरावावर तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांची सही असल्याची शहानिशा करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात विद्यमान सरपंच व ग्रामसेवक बॅंककडे फिरकलेच नाही. त्यामुळे संभ्रम झाला. परंतु असे असले तरीही आमच्या वरिष्ठ यंत्रणेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याशिवाय आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजचीही आम्ही तपासणी करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश होईल.
दरम्यान गुरुवारी यासंदर्भात वीरगाव पोलिस ठाण्यात ग्रामसेविका सोनाली शेटे तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा गुन्हा दाखल झाला नाही. याबाबत दिवसभर ठाण्यात खल सुरू होता. सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी याही ठाण्यात तळ ठोकून होत्या. गैरव्यवहार मोठा असल्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. गुरुवारी जरी यासंदर्भात गुन्हा दाखल झाला नसला तरी प्रक्रिया युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येत्या एक - दोन दिवसांत गुन्हा दाखल होणारच एवढे मात्र निश्चित!
मग्रारोहयोचा गैरव्यहार मोठा आहे. गुरुवारी याबाबत दिवसभर खल सुरू होता. त्यामुळे याबात आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविले आहे. असे असले तरी गुन्ह्याची प्रक्रिया न थांबवता सुरू आहे. परंतु गुन्हा दाखल होणारच.हे मात्र नक्की.
- शंकर वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक, वीरगाव
वीरगाव - मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या बॅंक खात्यावरून ६४ लाख रुपये काढले आहे. ज्यावेळी बॅंकेला ठराव प्राप्त झाला. तेव्हा गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीची मी स्वतः शहानिशा केली होती. या पार्श्वभूमीवर आमची वरिष्ठ यंत्रणा चौकशी करीत असून बॅंकेतील सीसीटीव्ही केॅमेऱ्याच्या फुटेजचीही तपासणी सुरू आहे.
- शिवशंकर लाईटवार, बँक व्यवस्थापक, वैजापूर