पाटबंधारे विभागाकडे मागणी
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे आणखी आठ दिवस आवर्तन सोडा. अशी मागणी शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मध्यमेश्वर कालव्यातून रब्बी आवर्तन सोडण्यात आले. परंतु दोन्ही तालुक्यांतील भीषण पाणीटंचाई पाहता आमदार रमेश बोरनारे यांनी आवर्तनाचा कालावधी आणखीन आठ दिवस वाढवून द्यावा. अशी मागणी नांमकाचे कार्यकारी अभियंता (वैजापूर) यांना २६ फेब्रुवारी रोजी एका पत्राद्वारे केली आहे. याची दखल घेत छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्यांनी हा कालावधी वाढवून देण्यासाठी नाशिक येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक यांना लेखी पत्र दिले आहे. वैजापूर - गंगापूर या दोन तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे ०८ फेब्रुवारीपासून रब्बी आवर्तन सुरू आहे. आवर्तनावेळी क्षेत्रीय स्तरावर आलेल्या अडचणींबाबत कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे प्राधिकरणास अवगत केले होते.
दरम्यान नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरचा अपेक्षित विसर्ग १२ किमीपर्यंत पाणीपातळी मिळाली नव्हती. त्यामुळे पिकअप वेअरची अपेक्षित पाणीपातळी ३२.८० इतकी होण्यास विलंब झाला. याशिवाय आवर्तन गोदावरी डावा कालव्यात नांदूर मधमेश्वर कालव्यासमवेत न सोडता १५ फेब्रुवारी रोजी दुपारी सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात उपसा केला. नांदूर मधमेश्वर कालव्याचा विसर्ग कालवा मुखाशी अनियमित मिळाल्याने वैजापूर व गंगापूर या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे नांमकाच्या पुच्छ भागात दरवेळी मिळणारी ३ मी. पाणीपातळी न मिळता केवळ २ मी. पाणीपातळी मिळाली. सद्यस्थितीत केवळ ५० टक्के इतक्या क्षेत्रावर सिंचन झालेले असून वैजापूर व कोपरगाव तालुक्यातील सिंचन अद्याप बाकी आहे.
तसेच २६ फेब्रुवारीच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत १ हजार २६२ एमसीएफटी इतकाच पाणी वापर झाला आहे. या पार्श्वभुमीवर २९ तारखेनंतर आवर्तन कालावधी आणखीन १० दिवस वाढवून १२०० एमसीएफटी पाणी देण्यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांन निर्देश देण्यात यावेत. या आशयाचे पत्र छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक व प्रशासक स.कों. सब्बीनवार यांनी नाशिक येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहे.