Encroachments | 'ते' आले, त्यांनी पाहिले अन् ते गेले', अतिक्रमण मोहीम फुसका बार

0

औपचारिकता पार पाडल्याची चर्चा 


वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याची कारवाई बुधवारपासून सुरवात झाली. अतिशय संथगतीने सुरू असलेल्या  कारवाईने फार काही साध्य होईल. असे वाटत नाही. पदपथावर थाटलेल्या बहुतांश टपऱ्या तशाच ठेऊन हे पथक पुढे चालते झाले. याशिवाय काही ठिकाणी हवाई अतिक्रमणे तशीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे 'ते' आले , त्यांनी पाहिले अन् ते गेले' अशीच गत या मोहीमेची झाली. ही कारवाई केवळ फार्स ठरली आहे. 








  छत्रपती संभाजीनगर - नांदगाव मार्गावरील तलवाडा घाटातील रस्ता दुरूस्ती करण्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गासह नागपूर - मुंबई महामार्ग, शिऊर बंगला, लासूरस्टेशन व कोपरगाव रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्र देऊन संबंधित अधिकाऱ्यांना कळविले होते. विशेषतः शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवले जाणार असल्याने व्यावसायिकांनी याचा चांगलाच धसका घेतला होता. छत्रपती संभाजीनगर - नांदगाव मार्गावरील तलवाडा घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 




त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक नागपूर - मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहे. प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून मालेगाव मनमाड- येवला वैजापूर- दहेगाव- लासूरस्टेशन छत्रपती संभाजीनगर ( ७५२ आय ) असा सुचविलेला आहे. पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडीअडचणी व त्यासंबधी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगाने वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे  बुधवारी सकाळपासून काढण्यास सुरुवात झाली. यावेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास अतिक्रमण हटविण्याची कारवाई शहरातील येवला रस्त्यापासून झाली. दरम्यान अतिक्रमण काढण्याची सबंधितांनी फक्त औपचारिकता पार पाडली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 




त्यामुळे ही अतिक्रमण हटाव  मोहिम फुसका बार ठरल्याचे चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होती. बहुतेक ठिकाणी अतिक्रमणे काढीत असताना व्यावसायिकांनी 'आम्ही टपऱ्या काढून घेतो' अशी विनंती केल्याने पथकाने काहीशी नरमाई घेतल्याने निदर्शनास आले. काही ठिकाणच्या हवाई अतिक्रमणांसह ( गॅलरी, पत्र्यांचे शेड) पदपथावरील अतिक्रमणे 'जैसे थे' परिस्थितीत होती. दरम्यान आणखीन दोन दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याची सूत्रांनी सांगितले.



खोदा पहाड निकला चुहाँ


शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या पार्श्वभूमीवर जेसीबी यंत्रासह ट्रॅक्टर, पोलिस अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पथक व  पालिका कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. हे पथक पाहून धडाकेबाज कारवाई होईल. असे नागरिकांना वाटले होते. परंतु पथकाची ही 'कासवगती' पाहून 'खोदा पहाड निकला चुहाँ' अशी प्रचीती आली. 




पथकाच्या नाकावर टिच्चून... 



अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वैजापूरच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन अणिक्रमणे काढण्याबाबत कळविले होते. यामध्ये हातगाड्या, फळविक्रेत्यांनी थाटलेले अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पथक अतिक्रमणे हटवित असताना हातगाड्या व फळविक्रेते मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून अगदी इंचभरही न हलता तेथेच उभे होते. त्यामुळे या पथकाने नेमके कोणती अतिक्रमणे काढली? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.




वैजापूर शहरात ही अतिक्रमण हटाव मोहीम अजून काही दिवस सुरू राहणार आहे. ज्यांनी पदपथ गिळंकृत केले. याशिवाय ज्यांची हवाई व मोबाईल अतिक्रमणे आहेत. ती देखील हटवली जातील. 


- एस. क्यू. कादरी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकर, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top