वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा
कर्ज वसुलीपोटी जमा केलेले ६९ हजार रुपये कंपनीत जमा न करता परस्पर हडप करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश शामसुंदर खामकर (रा. गडाख गल्ली, सोनई जि. अहमदनगर, ह.मु.लोणी (बु) ता.राहता जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महेश खामकर हा क्रेडिट अक्सेस ग्रामीण कंपनीत कार्यरत होता. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी तो कंपनीने वाटलेल्या कर्जाच्या रकमेची ग्राहकांकडून वसुली करत होता. वसुली दरम्यान ग्राहकांकडून त्याने ६९ हजार ८८७ रुपये इतकी रक्कम वसूल केली. परंतु सदरील रक्कम कंपनीत जमा न करता तो परस्पर हडप करत होता. ही बाब २० फेब्रुवारी रोजी क्रेडिट अक्सेस ग्रामीण कंपनीचे (वैजापूर) शाखा व्यवस्थापक संदीप मुंढे यांच्या निदर्शनास आली. अखेर सोमवारी त्यांनी पोलिस ठाणे गाठून कंपनीची रक्कम परस्पर हडप करणाऱ्या महेश खामकर याच्याविरुद्ध तक्रार दिली.