Accident | मद्यधुंद चालकाने बेधुंद कार चालविली अन् 'ते' दोघे जिवानिशी गेले.!

0

वैजापूर शहरानजीकची घटना 



 

भरधाव  जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने दोघेजण ठार तर अन्य एकजण गंभीर झाल्याची घटना नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहरानजीकच्या बाजरा संशोधन केंद्राजवळ घडली. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सुमारास घडली. अपघातातील मृतांचा रात्रीच मृत्यू झाला. 







कुंदन सुभाष कुमावत (२५ रा. चाळीसगाव ह. मु. लाडगाव रस्ता, वैजापूर ) व राणी ब्रिजेश रावत (४० रा. मध्यप्रदेश ह. मु. रोटेगाव ) अशी अपघातातील मृतांची नावे आहे तर व गोलू छोटेलाल रावत (२५ रा. मध्यप्रदेश ह. मु. रोटेगाव ) असे जखमीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती की, कुंदन कुमावत हा बांधकाम काम आटोपल्यानंतर मोटारसायकलवरून (एम. एच. १५ सी. यू. २६७१) राणी रावत व गोलू रावत या दोघांना सोडण्यासाठी रोटेगाव येथे जात होता. त्याचवेळी शहरानजीकच्या बाजरा संशोधन केंद्राजवळ समोरून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (एम. एच. १७ बी. पी. ५१६)  मोटारसायकलला जोराची धडक दिली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. 





या अपघातात तिघेही मजूर जखमी झाले. अपघातात मोटारसायकलचा अक्षरक्ष: चुराडा झाला होता. अपघात झाल्यानंतर कारचालक फरार झाला. घटनेनंतर स्थानिक नागरीकांनी रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर कुंदन व राणी या पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना कुंदन याची रस्त्यातच प्राणज्योत मालवली तर राणी हिचा उपचारादरम्यान रात्रीच घाटीत मृत्यू झाला. गोलू रावत याच्यावर वैजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.






तो मद्यधुंद होता



कारचालक हा शिर्डी येथील रहिवासी असून त्याने मद्यपान केलेले होते. तो मद्यधुंद असल्यामुळेच हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनेनंतर त्याने लगेचच घटनास्थळाहून पळ काढला. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. 




पोटाची खळगी अन् सर्व संपले... 


राणी कुमावत ही मध्यप्रदेशमधून मजुरीसाठी वैजापूर येथे आली होती. कुंदन हा चाळीसगावहून येथे मिस्त्री काम करण्यासाठी आला होता. पोटाची खळगी भरण्यासाठी येथे आले खरे. परंतु या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच संपून गेले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top