सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील देवडोंगरी बाबांच्या यात्रेत बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेलेल्या वडिलांसह मुलास काठीने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बुधवारी सुमारास वैजापूर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर आहादे (वय ४२) हे आपल्या कुटुंबियांसोबत तालुक्यातील शिवराई येथे राहतात. ३० जानेवारी रोजी जालिंदर हे आपला मुलगा आकाशसोबत घेऊन तालुक्यातील बोरसर साखर कारखाना येथे देवडोंगरी बाबा यात्रेसाठी गेले होते. देवडोंगरी बाबांचे दर्शन करुन यात्रेच्या मोकळ्या परिसरामध्ये बैलगाडा शर्यत सुरु असल्याचे समजल्याने सायंकाळी साडेसहा वाजल्याच्या सुमारास तेथे शर्यत पाहण्यासाठी गेले होते.
त्यावेळी शेषराव कोंडिराम डांगे, योगेश शेषराव डांगे, धनंजय शेषराव डांगे, नारायण उर्फ सौरभ वसंत डांगे, गणेश धनसिंग बेडवाल व जगदिश पप्पू बेडवाल हे सहा जण तिथे आले व ' तुला बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी कुणी बोलावले. असे म्हणून त्यांनी काठ्यांनी जालिंदर यांना मारहाण केली. मुलगा आकाश हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालाही काठीने पाठीवर मारहाण दुखापत केली. त्यानंतर तुम्ही परत बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आला तर तुम्हाला जिवंत मारुन टाकू. अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार एस.एस.पवार करीत आहेत.