शिऊर बंगला, लासूरस्टेशनचाही समावेश
छत्रपती संभाजीनगर - नांदगाव मार्गावरील तलवाडा घाटातील रस्त्याची दुरूस्ती करण्याच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गासह ( Nashik - Chatrapati Sambhajinagar National Highway) नागपूर - मुंबई महामार्गावरील ( Nagpur - Mumbai Expressway) अतिक्रमणे भुईसपाट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून २८ फेब्रुवारी रोजी ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. वैजापूर शहरासह ( Vaijapur City) शिऊर बंगला ( Shiur Bangla), लासूरस्टेशन ( Lasurstation ) व कोपरगाव ( Kopargaon) रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्र देऊन संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहेत. विशेषतः शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविणार जाणार असल्याने व्यावसायिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर - नांदगाव मार्गावरील तलवाडा घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक नागपूर - मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहे. प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून मालेगाव मनमाड- येवला वैजापूर- दहेगाव- लासूरस्टेशन छत्रपती संभाजीनगर ( ७५२ आय ) असा सुचविलेला आहे. या पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडीअडचणी व त्यासंबधी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगाने वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण स्थानिक पोलीसांच्या मदतीने काढण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात यावा. असे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रान्वये निर्देश दिले आहेत. याशिवाय लासूर- वैजापूर- कोपरगाव रस्त्यालगतचेही अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्यामुळे वळविण्यात आलेल्या रहदारीस मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होणार आहे. अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लासूरस्टेशन व वैजापूर शहरातील मुख्य रस्त्यालगत हातगाड्या, फळविक्रेते व अन्य लहानसहान विक्रेत्यांनीही अतिक्रमणे थाटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
काय आहे पत्रात. ?
उपरोक्त बाबींच्या अनुषंगाने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी अतिक्रमणे काढून रस्त्यावरील छोटी दुकाने, हातगाड्या आदी अतिक्रमणे हटवून कारवाई करण्यात यावी. कारवाईसाठी आवश्यक तो पोलिस बंदोवस्त व प्रशासकीय यंत्रणेला सूचित करुन आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी. असे लेखी पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. याच पत्राच्या प्रती माहितीस्तव तहसीलदारांसह नगरपालिकेचे मुख्याधिकारी, संबंधित ठेकेदार व ठाणेप्रमुख वैजापूर यांना देण्यात आल्या आहेत.
व्यावसायिकांना बजावल्या नोटीस
दरम्यान शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविणार येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर संबधित विभागाने अतिक्रमणे थाटलेल्या व्यावसायिकांना नोटीस बजाविल्या आहेत. प्रशासनाने नोटीस बजाविल्या असल्या तरीही व्यावसायिक अजूनही रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने धडक कारवाई केल्यानंतरच ही अतिक्रमणे हटली जातील. एवढे मात्र नक्की!
पदपथही केले गिळंकृत
प्रशासनाने शहरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला खरा. मोबाईल अतिक्रमणांनी ( हातगाड्या ) राष्ट्रीय महामार्गावरील पदपथही ( फुटपाथ) गिळंकृत केले आहेत. त्यामुळे शहरातील दुतर्फा असलेले पदपथ नावापुरतेच उरले आहे. त्यामुळे पदपथावरीलही अतिक्रमणे हटविण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.