आ. रमेश बोरनारे यांचा पुढाकार
वैजापूर तालुक्यातील १६ गावांना सिंचनाचा लाभ होणाऱ्या कन्नड तालुक्यातील शिवना - टाकळी मध्यम प्रकल्पाच्या दहा किलोमीटर कालव्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी पाटबंधारे विभागाच्या उच्चस्तरीय समितीने ४४१ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी राज्य सरकारकडे शिफारस केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या सुधारित प्रशासकीय मान्यतेवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर वैजापूर तालुक्यातील शिवना - टाकळी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे १६ गावांतील शेतक-यांना उपलब्ध होईल. असे आमदार रमेश बोरनारे यांनी सांगितले.
कन्नड तालुक्यात निर्मिती केलेल्या शिवना - टाकळी मध्यम प्रकल्पातील पाणी वैजापूर तालुक्यातील पोखरी, गारज, मनूर, साकेगाव, पाथरी,बाभुळगाव ( पिराचे) , बोरदहेगाव, राहेगव्हाण, धोंदलगाव, उंदिरवाडी, सोनवाडी, भायगावगंगा , जांबरखेडा,भोकरगाव, मालेगाव,खिर्डी कन्नड , साळेगाव या गावांना देण्यासाठी २० वर्षांपूर्वी कालव्याचे काम करण्यात आले होते. मात्र हा कालवा अनेक ठिकाणी नादुरुस्त झाला. तसेच धोंदलगाव ते बोरदहेगाव धरणापर्यंत कालव्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्यामुळे या भागातील शेतक-यांना सिंचनापासून वंचित राहवे लागते. या भागातील सिंचनव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आ.रमेश बोरनारे यांनी छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागातील अधिका-यांशी संपर्क साधून या कामासाठी नव्याने ४४१ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करुन घेतला.
अंतिम मंजुरीसाठी शिफारस
शिवना - टाकळी मध्यम प्रकल्प कालवा दुरुस्ती काम, भूसंपादन मोबदला, शेतक-यांना शेतात जाण्यासाठी पूल अशा सर्व बाबींचा विचार करुन ४४१ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय समितीसमोर मंजूरीला ठेवला होता.२० फेब्रुवारी रोजी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता मादाडे , मुख्य अभियंता घोगरे , पगारे यांच्या त्रिसदस्यीय समितीने मंजुरी देऊन शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी शिफारस केली आहे.
शिवना - टाकळी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा लाभ कालव्याच्या नादुरुस्त तसेच काही भागात कालव्याचे कामच अनेक वर्षांपासून रखडले होते. त्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागाने तयार केलेला ४४१ कोटींच्या प्रस्तावाला उच्चस्तरीय समितीने हिरवा कंदील दाखवल्यामुळे १६ गावांना कालव्यातून पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल.
- आमदार रमेश बोरनारे, वैजापूर