पंचायत समितीच्या कारभाराचे वाभाडे
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत पेव्हर ब्लॉकची कामे वर्षभरापासून अपूर्णावस्थेत आहे. ती पूर्ण केव्हा करणार? यासह विविध प्रश्नांची सरबत्ती करून गटविकास अधिकारी, तुम्ही अकार्यक्षम आहात. तुम्ही कार्यालयात थांबत नाही, सरपंच व नागरिकांना भेटत नाही. तालुका मोठा असून पाट्या टाकण्याचे काम चालणार नाही. काम करायचे नसेल तर सरळ निघून जा. असा सज्जड दमच आमदार प्रा .रमेश बोरनारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भरून गटविकास अधिकाऱ्यांसह ( BDO ) सर्वांनाच फैलावर घेतले. पंचायत समितीच्या ( Panchayat Samiti ) कारभाराचे वाभाडे काढल्याने सभागृहातील उपस्थित नागरिक चांगलेच आवाक झाले. दरम्यान आठवडाभरात मंडळनिहाय ग्रामसेवकांसह रोजगारसेवक, सरपंच व अभियंत्यांची कामांबाबत आढावा घेऊन अहवाल द्या. असे फर्मानच आ. बोरनारे यांनी अधिकाऱ्यांना सोडले.
वित्त आयोगाच्या निधी व अन्य कामांसाठी ग्रामसेवक रात्रीचा दिवस करतात. मात्र मग्रारोहयोचे मंजूर कामांचे प्रस्ताव दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे. हे चुकीचे असल्याचे म्हणत गटविकास अधिकारी देव घुनावत यांना 'तुम्ही अकार्यक्षम आहे, तुम्ही काय करतात ? दिवस काढायला येवू नका. तुम्ही कार्यालयात बसत नाही. सरपंच, ग्रामस्थांना तुमची भेट होत नाही. काम करायचे असेल तर सांगा अन्यथा निघून जा. असा सज्जड दमच जगताप यांनी यावेळी भरला. गणेश इंगळे, सोमनाथ भराडे, पारसनाथ कदम, सोनू बंगाळ, आदींनी यावेळी समस्या मांडल्या. मग्रारोहयोचे अभियंते फोन घेत नाही, कार्यालयात आल्यावर भेटत नाही. शिवाय तांत्रिक अडचणीसाठी बीडीओंचीही भेट होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तालुक्यातील महालगाव व लासूरगाव सर्कलच्या अभियंत्याकडे आयडी व पासवर्ड नसल्याने कामे खोळंबून पडल्याची तक्रार रामनाथ तांबे यांनी केली. कारण नसतांना हजेरीपत्रक शून्य करीत असल्याचे पारसनाथ कदम म्हणाले. बैठकीस कृषी अधिकारी एच. आर. बोयनर, उपअभियंता राजू कीर्तने, डी.टी.कांबळे, सुनील कदम, पारस घाटे, राजेंद्र साळुंके आदींसह सरपंच व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी देव घुनावत यांनी केले. दरम्यान या बैठकीला कार्यालयीन अधिक्षकांसह काही ग्रामसेवकांनी दांडी मारली होती. त्यामुळे या दांडीबहाद्दरांना नोटीस बजावण्याची सूचना आ.प्रा. बोरनारे यांनी बीडीओ घुनावत यांना केली.
आमदारांचा पारा चढला
मग्रारोहयोतून पेव्हर ब्लॉकची कामे वर्षभरापासून सुरु आहे. ती केंव्हा पूर्ण करणार ? एक-एक वर्ष कामे पूर्ण होणार नसेल तर कसे करायचे ? पहिलीच यादी अपूर्ण आहे, मग दुसरी व तिसऱ्या यादीतील कामे कधी पूर्ण व्हायची ? कामे मंजूर करून अशीच पडणार असेल तर काहीही उपयोग होणार नसल्याचे म्हणत आ.प्रा. बोरनारे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. या गलथान कारभारामुळे आमदारांचा पारा चांगलाच चढला होता.
दुसऱ्या दिवशीही हल्लाबोल
दरम्यान गटविकास अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने तालुक्यातील चोरवाघलगाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून संताप व्यक्त केल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्याच दिवशी आमदार रमेश बोरनारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी बीडीओंना फैलावर घेऊन चांगलेच कान टोचले. त्यांच्या गलथान कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने सर्वत्रच नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम व कामचुकार अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचीही मागणी होत आहे.