उपविभागीय अधिकाऱ्यांनी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप
वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पतंग उडविणाऱ्या मुलांना मारहाण करण्यासह अन्य आरोपावरून तरुणांच्या जमावाने पोलिस ठाण्यात राडा केला. तरुणांच्या घोषणांनी ठाण्यात मोठा गोंधळ उडाल्याने पोलिस यंत्रणा बुचकळ्यात पडली. याचवेळी उपविभागीय अधिकारी ठाण्यात येत असताना तरुणांनी त्यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींनी ठाण्यात येऊन उपविभागीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैजापूर बंद ठेवण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजी करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपावरून मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला. तेथून हा मोर्चा थेट ठाण्यात जाऊन धडकला. शेकडोचा जमाव आल्याने पोलिस यंत्रणा बुचकळ्यात पडली. डाॅ. जऱ्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करा. अशी मागणी तरुणांनी लावून धरली.
आमदार रमेश बोरनारे यांच्यासह भाजप नेते डाॅ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, विशाल संचेती आदींनी तेथे येऊन जऱ्हाड यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत तोफ डागली. जऱ्हाड यांची ही कृती अशोभनीय असून आम्ही ते सहन करणार नसल्याचे बोरनारे म्हणाले. डाॅ. परदेशींनी समाचार घेत ही दादागिरी खपवून घेणार नाही. त्यांच्याविरुद्ध पोलिस गुन्हा दाखल करणार नसेल तर आम्हाला आमचे पर्याय खुले असल्याचे ते म्हणाले. साधारणतः दोन तास चाललेल्या या राड्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व अन्य अधिकाऱ्यांनी नेत्यांसह जमावाला शांततेचे आवाहन केले. परंतु कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही वेळेनंतर जमाव पांगल्यानंतर तणाव निवळला अन् पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वैजापूर बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे शहरातील व्यवहार पूर्णपणे बंद होते.
गंगापूर चौफुलीसह शहरातील बहुतांश अतिक्रमणे मी भुईसपाट केली. याशिवाय डेपो रस्त्यावरील वसंत क्लबच्या गाळ्यांना सील लावले. कब्जा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे फेर रद्द करण्याचा इशाराही दिला होता. या घटनेचा राग मनात धरून राजकीय मंडळींनी विशेष हेतूने हे कुभांड रचले. वास्तविक मी कुणालाही मारहाण वगैरे केली नाही. मांजा पकडून गुन्हा दाखल केला. त्याचेच भांडवल करून हा डाव खेळला गेला.
- डाॅ. अरुण जऱ्हाड, उपविभागीय अधिकारी, वैजापूर