by satyarthi group
२५ टक्के रक्कम मंजूर ; दोन महसूल मंडळे वगळली
खरीप हंगामातील पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसलेल्या तालुक्यातील १ लाख २० हजार ४६९ शेतक-यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा मंजूर झाला आहे. मका व कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना तब्बल ४६ कोटी ६९ लाख ७७ हजार ५१८ रुपयांचा अग्रीम मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान तालुक्यातील केवळ २ महसूल मंडळे या नुकसानभरपाईतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कहीं खुशी, कहीं गम असल्याचे चित्र आहे.
पीकविमा अग्रीम : वैजापुरातील शेतकऱ्यांना ४७ कोटी
यंदाच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यामुळे मका, कपाशीसह खरीप पिकांचे नुकसान होवून शेतक-यांना आर्थिक फटका बसला आहे. या हंगामापासून राज्य शासनाने केवळ १ रुपयात पीकविमा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तालुक्यातील २ लाख ४५ हजार ७७४ शेतक-यांनी पीकविमा काढला होता. हंगामात पावसाचा पडलेला खंड व पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
यात मागील ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत चालू वर्षी ५० टक्केपेक्षा अधिक घट दिसून आली. या सर्वेक्षणाअंती ही १० महसूल मंडळ २५ टक्के अग्रिम पीकविम्यासाठी पात्र ठरली होती. तालुक्यातील शिऊर, गारज, महालगाव, नागमठाण, बाबतारा, वैजापूर, खंडाळा, जानेफळ, घायगाव व बोरसर या महसूल मंडळात सोयाबीन ६० टक्के व कपाशी ७० तर मका पिकाच्या उत्पादनात ७५ टक्के घट आली आहे. त्यामुळे या मंडळातील शेतक-यांना २५ टक्के अग्रिम विमा मंजूर झाला होता.
मात्र ही रक्कम नेमकी कधी मिळेल?
मात्र ही रक्कम नेमकी कधी मिळेल? याकडे शेतक-यांचे डोळे लागले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शेतक-यांच्या बँक खात्यात विम्याचे पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे. खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर धडकल्यावर शेतक-यांनी ती काढण्यासाठी बँकेत गर्दी केली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना या रकमेमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा
दरम्यान पीकविम्याच्या २५ टक्के अग्रीम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शिंदेसेनेचे आमदार प्रा.रमेश बोरनारे यांच्यासह ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, भाजप नेते डॉ.दिनेश परदेशी यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.
तालुक्यातील १० महसूल मंडळातील १ लाख २० हजार ४६९ शेतक-यांना २५ टक्के अग्रीम म्हणून ४६ कोटी ६९ लाख ७७ हजार ५१८ रुपये मिळणार आहे. मका पिकाला ६ हजार ८०० रुपये तर कपाशीला ९ हजार ३९० रुपये हेक्टरी असा विमा मंजूर करण्यात आला आहे.
- अशोक आढाव, उपविभागीय कृषी अधिकारी, वैजापूर