नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
विजय गायकवाड | सत्यार्थी
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सुरू असलेल्या मराठा समाज सर्वेक्षणाबाबत आता सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. सर्वेक्षणाच्या प्रश्नावलीत किचकट व क्लिष्ट प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने हा वादाचा विषय ठरू पाहत आहे. त्यामुळे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात सर्वेक्षण सुरू केले आहे. 'नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने' या उक्तीप्रमाणे या सर्वेक्षणाची गत झाली आहे. सुरवातीला अॅपची डोकेदुखी झाल्याने या सर्वे वाद्यांत सापडला. त्यानंतर सर्वेक्षणादरम्यान अंगठेबहाद्दर कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने यात खोगीरभरती झाल्याचे निदर्शनास येऊन मोठी बोंब झाली. या आॅनलाईन सर्वेक्षणात तब्बल १८२ प्रश्न आहेत. यातील काही प्रश्न वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खोलातील प्रश्नांमुळे प्रगणकांनाही तो विचारावा किंवा नाही. असा पेच निर्माण झाला आहे.
सरकारी सर्वे असला तरी एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किती डोकावले पाहिजे. यालाही काही मर्यादा असतात. परंतु शासनाने या सर्व मर्यादा हद्दपार करून 'नाहक डोकं खुपसण्याचे' काम सुरू केले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे पुरोगामित्वाचा ढोल पिटविला जात असताना दुसरीकडे विचारलेले प्रश्न हे किती प्रतिगामी आहेत. याचं भान ठेवायला पाहिजे होते. असाही एक मतप्रवाह आहे. परंपरेच्या जोखडात जेव्हा स्त्री - पुरुष वावरायचे त्या काळातील ही प्रश्नावली असल्याचे अनेकांनी मते नोंदविली आहे.
या मागे शासनाचा हेतू भलेही उदात्त असूही शकतो. यातून या समाजाचा शैक्षणिक व सामाजिक स्तर तपासणाचा हेतू शासनाचा असू शकतो. परंतु एकंदरीत सर्वेक्षणात उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून 'बुरसटलेल्या'पणाची जाणीव होते. त्यामुळे या जाती सर्वेक्षणात अनेक वादग्रस्त प्रश्न उपस्थित करून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. हिंदू धर्मात बुरखा / पडदा केव्हा होता? त्यामुळे हा प्रश्न संयुक्तिक आहे का? महिला पदर घेतात. हे माहित आहे. मराठा समाजात हळदी - कुंकू व मंगळसूत्र घालण्याची पद्धत पहिल्यापासूनच आहे व सर्वश्रुत आहे. तरीही हा प्रश्न विचारला गेला.
सरकारने नवस व बळीचा उल्लेख करून एक प्रकारे या परंपरेचे समर्थन केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. फुले - शाहू - आंबेडकरांच्या राज्यात पुरोगामित्वाचा डंका वाजविणाऱ्या सरकारला आता जाब विचारण्याची वेळ आली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाबाबत मोठे वादंग उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय आहे सर्वेक्षणातील प्रश्न
@ तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?
@ विधवांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?
@ विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का?
@ जागरण - गोंधळ अथवा नवसासाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का?
@ तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का?
@ तुमच्या समाजात लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असा नियम आहे का?
@ विधवांना हळदी-कुंकवाला आमंत्रित करतात का?