उपविभागीय अधिकाऱ्यांची धडक कारवाई
वैजापूर शहरातील डेपो रस्त्यावरील वसंत क्लब परिसरातील तब्बल ४४ गाळयांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी १४ जानेवारी दुपारच्या सुमारास टाळे ठोकण्याची धडाकेबाज कारवाई केली. या ठिकाणी व्यावसायिकांना अल्पभाडे असून या दुकानांची भाडेवाढ करण्यासाठी त्यांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या कारवाईमुळे व्यावसायिकांवर 'संक्रांत' आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वसंत क्लब परिसरात मागील अनेक वर्षांपासून ४० पेक्षा अधिक गाळे आहेत. हे गाळे वसंत क्लबने व्यावसायिकांना अल्पदरात भाडेतत्त्वावर दिले आहेत. दरम्यान यापैकी काही गाळ्यांचे लाखो रुपयात खरेदी-विक्री व्यवहार देखील झाले आहेत तर काहीनी वसंत क्लबला अल्पभाडे अदा करून गाळा इतर व्यवसायिकांना गलेलठ्ठ रकमेने किरायाने दिले आहेत.
याशिवाय काही भाडेकरूंनी या गाळ्यांची परस्पर खरेदी-विक्री व्यवहार देखील केले आहेत. ही बाब क्लबची पदसिद्ध अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या निदर्शनास आली. या अनुषंगाने त्यांनी क्लबच्या जागेत असलेल्या सर्व गाळ्यांची माहिती संकलित केली. पैकी क्लबच्या हद्दीतील ४४ गाळ्यांना ६ ते २ हजार रुपयांदरम्यान अल्प भाडे असल्याचे समजले. रविवारी दुपारी डॉ. जऱ्हाड यांनी या गाळ्यांना टाळे ठोकून सर्व व्यावसायिकांची बैठक बोलावली.
या बैठकीत त्यांनी 'भाडेवाढ मान्य करा अन्यथा गाळे रिकामे करा' असा इशारा व्यावसायिकांना दिला आहे. दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला वसंत क्लबचा अनागोंदी कारभार डॉ.जऱ्हाड यांच्या कारवाईमुळे चव्हाट्यावर आला. या कारवाईमुळे व्यावसायिकांवर 'संक्रांत' आली आहे.
वसंत क्लबकडे असलेली जागा ही शासनाची जागा आहे. तिथे अनेकांनी उलटसुलट व्यवहार केले आहेत. या गाळ्यात दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांनी भाडेवाढ मान्य न केल्यास ही गाळे जमीनदोस्त करून तीन मजली व्यापारी संकुल उभारून सर्व जाती धर्मातील गरजू तरुणांना गाळे किरायाने दिली जातील. वसंत क्लबच्यावतीने शर्तभंग करण्यात आला असून या जागेचे मूळ मालक शासन तर इतर हक्कात वसंत क्लबचे नाव वर्ग करणार आहोत.
डॉ. अरुण जऱ्हाड , उपविभागीय अधिकारी, वैजापूर